दालमिया समूह करणार जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूक


रिलायंसच्या मुकेश अंबानी यांनी जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत दिल्यापाठोपाठ देशातील अनेक बडे उद्योजक या संदर्भात योजना बनवू लागले आहेत. दालमिया समूहाचे अध्यक्ष संजय दालमिया यांनीही दोन महिन्यात जम्मू काश्मीरसाठीची गुंतवणूक योजना केंद्राला सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाचे आणि मुलायम सिंग यांना जवळचे मानले जाणारे दालमिया उद्योजक आणि माजी राज्यसभा सदस्य आहेत.

दालमिया यावेळी म्हणाले कि त्यांनी जम्मू मध्ये सुरु केलेला सिगारेट कारखाना सध्या बंद स्थितीत असून नवीन योजनेत तो पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे. यापूर्वीही त्यांनी काश्मीर मध्ये गुंतवणुकीचा प्रयत्न केला आहे. मात्र तेथे बाहेरचे उद्योजक जमीन घेऊन शकत नाहीत. उद्योग सुरु केला तर बाहेरून कामगार तेथे नेता येत नाहीत या अडचणी होत्या आणि तेथील तत्कालीन सरकारने वारंवार पाठपुरावा करूनही म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ती योजना बदलावी लागली होती. आता कलम ३७० रद्द केल्याने गुंतवणूक शक्य होणार आहे. यामुळे खोऱ्यात रोजगार वाढेल आणि विकासाला मदत मिळेल.

दालमिया यांचा जन्म लाहोरचा. फाळणीच्यावेळी ते भारतात आले असून त्यांनी जम्मू काश्मीर साठी ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्म योजना आखली आहे. या माध्यमातून ते काश्मिरी शाली व अन्य हस्तकला उत्पादने विक्रीसाठी मदत करणार आहेत.

Leave a Comment