या महिला पोलीसाने लावला बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या २०० प्रकरणांचा छडा


अवघ्या दोन महिन्यांमध्ये पाकिस्तानमधील स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने नियुक्तीनंतर बलात्काराच्या २०० प्रकरणांचा छडा लावला आहे.

या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव कुलसूम फातिमा असे असून त्यांची पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पाकपट्टण येथील पोलीस स्थानकामध्ये नियुक्ती झाल्यानंतर बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी करण्यास त्यांनी सुरुवात केल्याचे द न्यूज इंटरनॅशनलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अल्पावधीत फातिमा यांनी केलेल्या या कामाची दखल आता आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून घेतली जात आहे.

फातिमा यांनी बीबीसीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबद्दल ऐकून मला खूप चीड यायची, असे म्हटले होते. पण त्यावेळी मी पोलीस नसल्याने काही देखील करु शकत नसल्याची अशी खंत आपल्याला नेहमी वाटत असयाची असे म्हटले होते. मी अशा एखाद्या पदावर कार्यरत होईन ज्यामुळे मला लहान मुलींसाठी काहीतरी करता येईल, असे माझे स्वप्न होते. त्यातच मी जेव्हा पंजाब पोलीस दलाची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाले आणि मला ही संधी माझ्याकडे चालून आली, असे फातिमा सांगतात.

सुरुवातीपासून पोलीस म्हणूनच नोकरी मला करायची होती आणि मला ती करण्याची संधी मिळाली याबद्दल मला खूप आनंद असल्याचे फातिमा सांगतात. फातिमा यांच्याकडे नियुक्तीनंतर महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांचा तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याची पाकपट्टणसारख्या भागामध्ये पहिल्यांदाच नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांमध्ये या नियुक्तीमुळे पोलिसांवरील विश्वास वाढेल अशी अपेक्षा फातिमा यांना नियुक्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment