सहखेळाडूंना सुखरुप घरी पोहचवल्यानंतरच इरफानने सोडले काश्मीर!


श्रीनगर : सध्या आपल्या देशाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण स्थिती असून तेथे सध्याच्या घडीला असणाऱ्या पर्यटकांना जम्मू काश्मीर सोडण्यास सांगितले आहे. दरम्यान, भारताचा जलदगती गोलंदाज इरफान पठाण आणि त्याच्यासोबत 100 हून अधिक खेळाडूंना जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने काश्मीरमधून तात्काळ परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इरफान पठाण आणि त्याच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर लोक रविवारीच तिथून परतले असून सरकारकडून काश्मीरमधील लोकांनीच राज्यात थांबावे असा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, काश्मीर सोडण्यापूर्वी तेथील स्थानिक मुलांना भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने आधी घरी सोडले. इरफान त्याबद्दल म्हणाला की, आमच्यासाठी मुले सुरक्षित घरी पोहचणे महत्त्वाचे होते. त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. काश्मीर अशावेळी सोडून मी सुरक्षित बाहेर पडणे योग्य वाटले नाही. त्यांच्या घरी पोहोचल्याची खात्री केली. सर्व मुले घरी पोहोचल्यानंतर काश्मीर सोडल्याचेही इरफान पठाणने सांगितले.

काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता जेकेसीएने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार आपण करायला हवा. सर्वकाही लवकरच सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. चांगली तयारी आणि योग्य निवड व्हावी यासाठी जूनमध्येच शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे इरफान म्हणाला. खेळाडूंनी परतण्याबाबत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी यांनी रविवारी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, कँपमध्ये असलेल्या जवळपास 102 खेळाडूंना परत पाठवले आहे. येथील परिस्थिती तणावपूर्ण असून काय चालले आहे हे कळत नाही. येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा घेतली जाणार आहे.

Leave a Comment