
नवी दिल्ली – क्रिकेटमधील नियमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने महत्त्वाचे बदल केले आहेत. नियमातील बदलाचा निर्णय लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत घेण्यात आला. क्रिकेटमधील गेल्या काही वर्षातील घटनांचा अभ्यास करून हा निर्णय आयसीसीने घेतला आहे. नवीन नियम एक ऑगस्ट २०१९ पासून लागू होणार आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून या नियमाची सुरुवात होणार आहे. बदली खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल आणि षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंकडून दंड आकारण्यात येणार आहे.
विश्वचषकानंतर आपल्या नियमात आयसीसीने केले महत्वाचे बदल
खेळाडू अनेक वेळा जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. एखादा खेळाडू सामन्यादरम्यान जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करत असे.
आंतरराष्ट्रीय कर्णधारांना षटकांची गती धिमी राखल्याबद्दल यापुढे बंदीला सामोरे जावे लागणार नाही. या नियमांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बदल केला असून, अशा प्रकारच्या नियमांचे आता उल्लंघन झाल्यास, कर्णधाराऐवजी संपूर्ण संघाला ही शिक्षा भोगावी लागणार आहे. आयसीसीने आयसीसीच्या क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस मान्य केली आहे. हा नवा नियम १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून लागू होईल. वारंवार कर्णधारांकडून या नियमांचे उल्लंघन होत असले, तरी त्यांच्यावर आता बंदी लादली जाणार नाही. षटकांची गती धिमी राखल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंना सारखेच जबाबदार धरण्यात येईल. कर्णधारासह सर्वानाच समान शिक्षा सुनावण्यात येईल, असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.
