
बॉलिवूडमध्ये महेश मांजरेकर यांची धाकटी कन्या सई मांजरेकर पदार्पण करणार आहे. सई मांजरेकर सुपरस्टार सलमान खानसोबत ‘दबंग 3’ मधून मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे.
‘दबंग 3’मध्ये सलमानसोबत झळकणार मराठी स्टारकिड
याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप ‘दबंग’च्या निर्मात्यांकडून करण्यात आलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानसोबत या चित्रपटाच्या तिसऱ्या आवृत्तीत सईची जोडी जमणार आहे. ‘दबंग 3’ मध्ये महेश मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी झळकणार असल्याचे म्हटले जात होते. पण अश्वमीला अभिनयात गोडी नसल्याने तिच्याऐवजी धाकट्या बहिणीची वर्णी लागली.
सई ‘दबंग 3’ मध्ये सलमानसोबत फ्लॅशबॅक सीन्समध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानसोबत सईच्या दृश्यांचे चित्रीकरण झाल्याची माहिती आहे. दोघांवर एक गाणेही चित्रित होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवा यांच्या खांद्यावर ‘दबंग 3’च्या दिग्दर्शनाची धुरा आहे. ‘दबंग’ सीरीजमधील पहिल्या भागाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने केले होते, तर दुसऱ्या भागाचं सलमानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान याने केले होते.
विशीतील पोलिस चुलबुल पांडेची भूमिका तिसऱ्या भागात सलमान साकारणार आहे. सलमानने त्यासाठी वजन घटवले आहे. सध्या साताऱ्यातील फलटणमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या ठिकाणी चाहत्यांच्या तोबा गर्दीमुळे चित्रीकरणात अडथळे निर्माण झाले होते. सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसेल, तर अरबाज खान मख्खीची भूमिका साकारेल. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपही चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याची व्यक्तिरेखा खलनायकाची नसून नायकाला समांतर अशी नकारात्मक भूमिका असेल, असे निर्मात्यांनी सांगितले. 20 डिसेंबर 2019 रोजी ‘दबंग 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
