
पुणे : पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्ध चित्रपटागृहात समोसे पुरवणाऱ्या मे. एम. के. एंटरप्राइजेस या उत्पादकाला समोसे तयार करण्यावर व विक्री करण्यावर बंदी घातली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन समोसे तयार होत असलेल्या कारखान्यात झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.
पुण्यातील आयनॉक्स, पीव्हीआरमधील समोश्यांवर एफडीएची बंदी
अन्न व औषध प्रशासनाने खराळवाडी, पिंपरी येथील समोसा उत्पादक कारखाना मे. एम.के. एंटरप्राइजेस यांचा उत्पादन व विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि विशाल ई-स्क्वेअर या नामांकित चित्रपटागृहात या कारखान्यात तयार होणारे समोसे विकले जात होते.
हे समोसे ज्या ठिकाणी तयार केले जात होते, तेथे अत्यंत अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे. समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणार पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी देखील आतापर्यंत करण्यात आली नव्हती. तसेच काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तेल तीन ते चार वेळा वापरण्यात येत होते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
