व्हॉट्सअपमधील बग शोधून देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकचे खास गिफ्ट


तिरुअनंतपुरम (केरळ) : एका भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकने प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये बग शोधून काढल्यामुळे खास गिफ्ट दिले आहे. व्हॉट्सअॅपमध्ये मेमरी करप्शन बग केरळमधील एका 19 वर्षाच्या इंजीनियरिंग विद्यार्थ्याने शोधून काढला आहे. के. एस. अनंतकृष्णा असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीटेकचा विद्यार्थी आहे. जो बग अनंतकृष्णाने शोधून काढला आहे, त्या बगमुळे कोणी दुसरा व्यक्ती तुमची व्हॉट्सअॅपवरील फाईल्स तुमच्या परवानगी शिवाय हटवू शकतो. ही कमजोरी शोधून काढल्यामुळे फेसबुकनेही या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.

दोन महिन्यापूर्वी या बगचा शोध अलपुझा येथे राहणाऱ्या अनंतकृष्णाने लावाला होता आणि व्हॉट्सअॅपवर मालकी हक्क असलेल्या फेसबुकच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. तसेच या कमजोरीबद्दलचा उपायही अनंतकृष्णाने दिला आहे. फेसबुकनेही दिलेल्या उपायानुसार बग हटवण्यासाठी काम केले आणि बग पूर्णपणे हटवण्यात यश आल्यामुळे अनंतकृष्णाचा सत्कार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

अनंतकृष्णाला 500 डॉलर (34 हजार रुपये) रोख गिफ्ट दिले आहे. तसेच आपल्या प्रसिद्ध अशा हॉल ऑफ फेममध्येही फेसबुकने अनंतकृष्णाला जागा दिली आहे. फेसबुकच्या हॉल ऑफ फेममध्ये अशा लोकांना जागा दिली जाते, जे त्यांच्या अॅपलीकेशनमधील बग शोधून काढतात. फेसबुकच्या या वर्षाच्या यादीत अनंतकृष्णाला 80 व्या जागेवर स्थान मिळाले आहे. अनंतकृष्णा स्वत:ला इथिकल हॅकिंगमध्ये व्यस्त ठेवतो. त्याने केरळ पोलिसांच्या सायबरडॉमसोबतही काम केले आहे.

Leave a Comment