
जालना : सध्या राज्यात काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारल्यानंतर विधानसभेसाठी जोमात सुरुवात करावी, तर तिथेही अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशी स्थिती झाली आहे. भाजपमध्ये काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवेश करणार असून, काँग्रेसचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आपण आणि सोबत दहा आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे सांगितले. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.
10 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अटीतटीची भूमिका घेतली होती. आपण रावसाहेब दानवेंच्या पराभवासाठी वाट्टेल ते करु, असा इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला होता. पण, सत्तारांचा इशारा आता मावळला असून, दानवेंच्याच हजेरीत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
डोक्यावर केस रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय उगवू देणार नाही, लोकसभा निवडणुकीदरम्यान रावसाहेब दानवेंवर केलेल्या टीकेबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता, ते म्हणाले, मला रावसाहेब दानवे कंगवाही देतील आणि भांग पण पाडून देतील. अब्दुल सत्तार यांनी यावेळी काँग्रेसला धक्का देणारी माहिती सुद्धा सांगितली. भाजपमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वात 10 आमदार प्रवेश करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
