
कोलकाता – मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलामध्ये हिंसाचार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचार बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३२४ या कलमाचा भारतात बहुधा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडून पहिल्यांदाच बंगालमध्ये कलम ३२४ चा वापर
प्रचार करण्यावर गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेच्या नऊ जागांसाठी १९ मे रोजी बंगालमध्ये मतदान होत आहे. हा निर्णय मतदान प्रक्रिया व्यवस्थित राबवली जावी, यासाठी घेण्यात आला आहे. कोलकातामध्ये झालेल्या गोंधळाची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने त्यावरुन कडक पाऊल उचलली आहेत. पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडे गृह सचिवांच्या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे पोस्टर्स अमित शहा यांच्या रॅलीच्या आधी काढून टाकण्यात आले होते. सोशल मीडियावर पोस्टर्स फाडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅली दरम्यान शहा यांना काळे झेंडे दाखवले होते. यावेळी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. अमित शहा यांच्या रॅलीमध्ये झालेल्या संघर्षात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती.
