
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप हा मोदीकेंद्रित पक्ष असल्याचा आरोप फेटाळत, कधीच व्यक्तिकेंद्रित आमचा पक्ष होणार नसल्याचे प्रतिपादन केले.
भाजप झाला नाही वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष – गडकरी
वाजपेयी किंवा अडवाणींचा भाजप पक्ष झाला नाही. तसेच केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचा तो पक्ष होणार नाही. भाजप कधीच व्यक्तिकेंद्रीत नव्हता आणि होणारही नाही. कारण विचारधारेवर तो आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना असल्याचे गडकरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
भाजपला पूर्ण बहुमत लोकसभा निवडणुकीत मिळणार नाही, असे अनेकांनी केलेले भाकीत गडकरी यांनी फेटाळले. ते म्हणाले, भाजपला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील. पक्ष मजबूत असेल, परंतु त्याचे नेते कमकुवत असतील आणि नेते मजबूत असतील परंतु पक्ष कमकुवत असेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत. पण, लोकप्रिय नेते स्वाभाविकपणे पुढे येतात, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
