
मुंबई – आता काही दिवसांचा कालावधी एकदिवसीय विश्वचषकासाठी उरला असून क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी या पार्श्वभूमीवर आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयी संघाचे नेतृत्व करणारे कपिल देव यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भारताने १९८३साली इंग्लंडमध्ये कपिल यांच्या नेतृत्वात आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
विश्वचषकाच्या सेमाफायनलपर्यंत नक्की पोहचेल टीम इंडिया
२०१९ च्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत नक्कीच धडक मारेल, पण विश्वचषक कोण जिंकेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघही सेमीफायनलपर्यंत धडक मारतील असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. तसेच भारताच्या वेगवान गोलंदाजांना इंग्लंडच्या खेळपट्ट्या चांगली साथ देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून सुरू होणार आहे. यात भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होईल.
