इंडोनेशियाच्या राजधानीचे होणार स्थलांतर


इंडोनेशियाची राजधानी जकार्ता जगातील सर्वाधिक वेगाने सिंक म्हणजे बुडत चाललेले शहर बनले असून इंडोनेशिया सरकारने देशाची राजधानी जावा बेटांवरून बाहेर जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.राजधानी जावा बेटाबाहेर नेण्याच्या नॅशनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग बोर्डने तयार केलेल्या योजनेला इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो समर्थन दिले आहे. अर्थात ही नवी राजधानी कुठे नेली जाईल याचा खुलासा केला गेलेला नसला तरी स्थानिक मिडियातील बातम्यानुसार पलानकोरायाचे नाव सर्वात पुढे आहे. हे ठिकाण बोर्नियो बेटावर आहे.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार जकार्ता सर्वाधिक वेगाने बुडते आहे. त्याचे मुख्य कारण पिण्यासाठी आणि अन्य वापरासाठी भूजल पाण्याचा होत असलेला प्रचंड प्रमाणावर उपसा हे आहे. इंडोनेशिया मुळातच दलदलीची जमीन असलेल्या किनाऱ्यावरवर वसलेले आहे. जकार्ता शहराच्या जमिनीखाली १३ नद्या आहेत आणि दुसरीकडे जावा सागरातून रात्रंदिवस शहराकडे लाटा झेपावत असतात. त्यामुळे शहराचा मोठा भाग सतत पाण्याखाली असतो. संशोधकांच्या मते २०५० पर्यंत जकार्ता शहर त्यावेळी ९५ टक्के पाण्यात बुडालेले असेल. दरवर्षी हे शहर २५ सेंटीमीटर वेगाने बुडते आहे. गेल्या १० वर्षात ते दीड मीटरने समुद्रात बुडाले आहे.


वास्तविक उत्तर जकार्ता ऐतिहासिक काळापासून बंदर आहे आणि आजही ते देशातील सर्वात व्यस्त बंदर आहे मात्र येत्या १० वर्षात ते अन्यत्र हलविले जाईल. त्यासाठी २३ ते ३३ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार असून नव्या राजधानीत लोकांना राहण्यासाठी आणि अन्य सोयी सुविधासाठी आवश्यक बांधकामे केली जाणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार जकार्ता मध्ये १ कोटी नागरिक आहेत तर ग्रेटर मेट्रोपोलिटन भागात ३ कोटी नागरिक राहत आहेत.

Leave a Comment