
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे ओपीनिअन पोल जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई
सध्या देशात लोकसभा निवडणुकांबरोबरच काही राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ११ एप्रिल २०१९ ला सकाळी ७ ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी १९ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या ओपीनिअन पोल सर्वेक्षण करण्यास तसेच वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे एक्झिट पोल प्रसारित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
तसेच कोणत्याही ओपिनिअन पोल किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी ४८ तास इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
