अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये सापडले १.८ कोटी

randeep-surjewal
नवी दिल्ली – काँग्रेसने भाजपवर अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप केला असून दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर हा आरोप केला आहे. त्याचबरोबर यावेळी पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला. याप्रकरणी रणदीप सुरजेवाला म्हणाले की, १.८ कोटी रूपये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून जप्त करण्यात आले असून हे पैसे मते विकत घेण्यासाठी भाजप वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.


निवडणुक आयोगाने अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल का केला नाही? असाही काँग्रेसने पश्न उपस्थित केला आहे. तीन जणावर या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा यामध्ये समावेश आहे.


पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून मंगळवारी रात्री उशीरा तब्बल १.८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती. पैसे जप्त करण्याचा व्हिडीओ निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल मीडिायवर व्हायरल झाला आहे. हे पैसे गेस्ट हाउसमध्ये उपस्थित असलेल्या पाच गाड्यातून जप्त करण्यात आले आहेत. भाजपचा जप्त करण्यात आलेल्या पैशांच्या मदतीने मते विकत घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Leave a Comment