अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात भारताने कोरले स्वतःचे नाव

narendra-modi
नवी दिल्ली – देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले असून भारताकडून एक उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात यश आले आहे. भारत हा अशा स्वरुपाची कामगिरी करणारा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली. ही मोहीम आम्ही कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. देशाच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम आम्ही राबवली. जगात आम्हाला शांतता कायम ठेवायची आहे, युद्धाचा आमचा कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आमच्या वैज्ञानिकांनी काही वेळापूर्वीच अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडून अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात भारताने स्वतःचे नाव कोरले असून, हा देशासाठी गर्वाचा दिवस असल्याचेही मोदी म्हणाले आहेत. भारताचा अंतराळ विज्ञान क्षेत्रात प्रवेश झाला आहे. भारताला उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळाले असल्याचेही मोदी म्हणाले. भारताने ‘अँटी सॅटेलाइट मिसाइल’द्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये एक उपग्रह पाडला. हा उपग्रह अवघ्या ३ मिनिटांमध्ये पाडण्यात आला. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा वाढली असल्याचे मोदींनी सांगितले.

आज सकाळीच ११:४५ ते १२ वाजेदरम्यान महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे मोदींनी टि्वट करत सांगितले होते. तुमचा टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडिया सुरू ठेवा, असेही ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी आज (बुधवारी) नेमकी काय घोषणा करणार, याकडे देशवासियांचे लक्ष लागून होते.