आरपीआयवर होणार नाही बहुजन वंचित आघाडीचा परिणाम

ramdas-athawale
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एमआयएमचे असुउद्दीन ओवेसी आणि भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी राज्यभरात घेतलेल्या सभांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण यावरुन आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना चिमटा काढत प्रकाश आंबेडकरांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आरपीआयवर (आठवले गट) बहुजन वंचित आघाडीचा परिणाम होणार नाही. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी नवीन राजकीय आघाडीची स्थापना केली आहे. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण त्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, त्याचबरोबर निवडणुका जिंकण्यात बहुजन वंचित आघाडीला यश मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

आठवले पुढे म्हणाले, भाजपने युतीतील छोट्या पक्षांना २०१४मधील लोकसभा निवडणुकीमध्ये चार जागा दिल्या. यात आरपीआयला सातारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा येथील जागा आणि राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीची जागा दिली होती. त्यांनी आमच्या पक्षाला आता किमान एक जागा द्यावी. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहू शकेल. नरेंद्र मोदी किंवा फडणवीस सरकारविरोधात मी नाही, या दोन्ही सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, असे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भूतकाळात आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेली अपमानास्पद वागणूक विसरु शकत नाही. काँग्रेसने २००४ साली शिर्डीत माझा पराभव करण्यासाठी षडयंत्र रचले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नेहमी दलित मतांचा वापर केला, यामुळेच मी आघाडीतून बाहेर पडत युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment