
लखनौ – अवघ्या काहीच दिवसात देशातील लोकसभेच्या निवडणुकीला सुरवात होणार आहे. याच दरम्यान प्रत्येक राजकीय पक्षात सुरु असलेले वाद आता चव्हाट्यावर यायला सुरवात झाली आहे. भाजपने 2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात चांगले यश मिळवले होते. त्याचवेळी उन्नाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक जिंकलेल्या साक्षी महाराजांना यावेळी आपल्याला उमेदवारी भेटणार नसल्याची जाणीव झाल्यानंतर चक्क आपल्या पक्षालाच धमकी दिली आहे.
उमेदवारी दिली नाही तर खुप वाईट परिणाम होतील – साक्षी महाराज
देशातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर उमेदवारी देण्यास सुरू केली आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव लोकसभा मतदार संघात मात्र साक्षी महाराज पक्षावर नाराज असल्याचे दिसत आहे. यावेळी आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांना पत्र लिहून त्यांनी चक्क धमकीच दिली आहे.
मागच्या निवडणुकांमध्ये आपण भरघोस मतांनी निवडून आलो होतो. बसप आणि काँग्रेस सारख्या पक्षांची त्यावेळी डिपोझिट ही जप्त झाले होते. तर, या लोकसभेमध्ये आपण भाजपचे एकमेव ओबीसी उमेदवार असल्यामुळे आपल्याला भाजपने उमेदवारी द्यावी, असे स्पष्टीकरण साक्षी महाराजांनी प्रदेशाध्यक्षांना दिले आहे. तर, ओबीसी समुदायाला डालवल्याचे आरोप पक्षावर लागत आले आहेत. त्यामुळे मला डालवू नका, असेही साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
माझ्यापूर्वी जवळपास एक दशकापर्यंत या मतदार संघामध्ये भाजप सत्तेपासून दूर राहीली आहे. भाजपजवळ येथे तेव्हापासून उमेदवार नाही. तर, येथील सहाही आमदार आणि विधान परिषद सदस्य भाजपचे आहेत. पक्षाने जर माझ्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला येथून उमेदवारी दिली तर कोटींच्या संख्येत कार्यकर्त्यांना त्यांचे दुःख होईल. त्याचा परिणाम अत्यंत वाईट असेल, अशी धमकीच महाराजांनी आपल्या पत्रातून दिलेली आहे.
