एका इवल्याशा ग्रहाची मोठी आणि सुरस कहाणी!

pluto
आज 18 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी, 89 वर्षांपूर्वी, एका शास्त्रज्ञाने एक छोटासा ग्रह शोधून काढला. या इवल्याशा ग्रहाचे नाव काय ठेवावे, यावरून शास्त्रज्ञांमध्ये मतभेद झाले. त्यातून त्यासाठी लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आणि एका शाळकरी मुलीने त्याचा मान मिळविला. परंतु शोध लागल्यानंतर 75 वर्षांनी त्याला ग्रहमालेतून बाहेर काढण्यात आले आणि आज एक लघुग्रह म्हणून त्याचा दर्जा उरला आहे.

ही कहाणी आहे प्लूटो या ग्रहाची. क्लॉईड टॉमबॉ या शास्त्रज्ञाने 18 फेब्रवारी 1930 रोजी हा ग्रह शोधून काढला. आधी याला ग्रह मानण्यात आले होते. मात्र नंतर हा मान मिळण्यासाठी तो पात्र नसल्याचे शास्त्रज्ञांनी ठरविले. प्लूटो ही ग्रीक पुराणांमधील पाताळाची देवता हेडेस हिचे दुसरे नाव आहे. या ग्रहाला हे नाव मिळण्याची कथा मोठी मनोरंजक आहे.

या ग्रहाच्या नामकरणासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यात व्हेनेशिया बर्नी (नंतरची व्हेनेशिया फेअर) या 11 वर्षीय मुलीने हे नाव सुचविले होते. व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. ती ऑक्सफोर्डमध्ये राहत होती. मोठी झाल्यावर अकाउंटंट आणि शिक्षक म्हणून व्हेनेशियाने काम केले. तिचे निधन 30 एप्रिल 2009 रोजी झाले.

प्लूटोला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 248 वर्षे लागतात. त्यामुळे तेथे नेहमी अंधार असतो, म्हणून त्याचे नाव प्लूटो ठेवावे, असे व्हेनेशियाचे म्हणणे होते. या काळ्या व थंड ग्रहासाठी हे नाव शोधून दिसेल, असे तिला वाटले. तिने आपले आजोबा फाल्कनर मॅडन यांच्याशी बोलतांना हे सांगितले होते. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी लॉवेल लॅबोरेटरीज प्रयोगशाळेतील आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. टॉमबॉलाही हा प्रस्ताव आवडला कारण या नावात लॉवेलच्या नावाचे आद्याक्षर (पीएल) येत होते. प्लूटो हे नाव 1 मे 1930 रोजी अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे एखाद्या ग्रहाला नाव देणारी एकमेव महिला असल्याचा मान व्हेनेशियाला मिळाला.

ही लॉवेल प्रयोगशाळा पर्सिव्हल लॉवेल या शास्त्रज्ञाची होती. तो 1905पासून या ग्रहाचा शोध लावण्याच्या पाठीमागे होता. मात्र त्याच्या बायकोने या प्रयोगशाळेवर हक्क मिळण्यासाठी खटला दाखल केल्यामुळे हे काम रखडले. अखेल लॉवेलला आपल्या हयातीत प्लूटोचा शोध लावता आला नाही. नंतर याच प्रयोगशाळेत टॉमबॉ दाखल झाला. त्याने अथक परिश्रम करून 18 फेब्रवारी 1930 रोजी हा शोध लावला. मात्र त्याची अधिकृत घोषणा 13 मार्च 1930 रोजी करण्यात आली. कारण युरेनसचा शोध त्या दिवशीच लागला होता आणि पर्सिव्हल लॉवेलचीही ती जन्मतारीख होती. प्लूटोचा शोध टॉमबॉगने लावला असली तरी प्लूटोच्या शोधामागे एका भारतीय व्यक्तीचेही कष्ट होते. ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांनीही प्लूटोचे अचूक गणित मांडले होते.

हा ग्रहही आहे गंमतीशीर. प्लूटो आकाराने आपल्या चंद्रापेक्षाही लहान आहे. अमेरिकेच्या रूंदीच्या अर्धा एवढा तो आकाराने आहे. त्याचे वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा 500 पटींनी कमी आहे. तसेच त्याचा सर्वात मोठा चंद्र हा प्लूटोच्या निम्म्या आकाराचा आहे. प्लूटोचा शोध लागला आणि त्यानंतर त्याची ग्रहांमधून हकालपट्टी झाली तेवढ्या काळात त्याचे सूर्याभोवतीचे एक तृतीयांशपेक्षाही कमी परिभ्रमण झाले होते. नासाच्या वतीन न्यू हॉरिझन्स हे यान 2006 साली प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान 14 जुलै 2015 रोजी प्लूटोजवळून गेले होते. त्यावेळी त्याचा शोध लावणाऱ्या टॉमबॉ याच्या अस्थींचा काही भाग या यानात ठेवण्यात आला होता.

इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियन ही खगोलशास्त्रज्ञांची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी संघटना. तिची 26वी सभा 24ऑगस्ट 2006 मध्ये प्राग येथे भरली होती. त्या सभेत प्लुटोच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तोपर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण या सभेत प्लुटो ग्रह नाही याबाबत खगोलशास्त्रज्ञांचं एकमत झाले आणि तो दर्जा काढून घेण्यात आला. हा दर्जा काढून घेण्याची चर्चा सुरू होती त्यावेळी व्हेनेशिया या नव्वदीच्या घरात होत्या. त्यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, “या वयात आता मला या चर्चेत मला फारसा नाही, परंतु तो ग्रहच राहावा असे मला वाटते.”