२००९ च्या निवडणूकीत रिपाइंला दलितांनी मतदान केले नाही

ramdas-ambedkar
सोलापूर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २००९ च्या निवडणूकीत रिपाइंला दलितांची मते मिळाली नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आज सोलापूर दौ-यावर आहेत. हे राजकीय वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. त्यांनी यावेळी वाऱ्यासारखी दिशा बदलून सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे, असा खोचक सल्लाही आंबेडकरांना दिला.

सोलापूर शहरामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामदास आठवलेही या मेळाव्याला हजर आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खळबळजनक वक्तव्य केली आहेत. ते म्हणतात, भाजपला दलितांच्या मतांच्या विभाजनाचा फायदा होतो. मला याची प्रचिती २००९ च्या निवडणूकीत आली. त्या निवडणूकीत रिपाइंने १११ जागा लढवल्या, मात्र एकही जागा जिंकली नाही. या निवडणूकीत दलितांची मते मिळाली नाहीत, असे ते म्हणाले.

सभेची गर्दी पाहून राज्यात सत्ता मिळेल या भ्रमात प्रकाश आंबेडकरांनी राहू नये. प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून वाऱ्याची दिशा पाहून सत्ता कशी मिळवायची ते शिकावे, असेही आठवले म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूकीत रिपाइंला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment