
बॉलिवूडची ‘क्विन’ म्हणून ओळखली जाणा-या कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला ‘मणिकर्णिका-द क्विन ऑफ झांशी’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. पण प्रदर्शनापूर्वीपासूनच हा चित्रपट वादविवादात अडकला आहे. कंगनावर दिग्दर्शक क्रिशपासून तर अभिनेत्री मिष्ठी चक्रवर्ती यांनी दिग्दर्शनीय श्रेय घेतल्याचा आरोप केला. त्यांना कंगनानेही चांगलेच प्रत्युत्तर दिले. बॉलिवूडच्या एकाही बड्या कलाकाराने हा वाद सुरू असतानाच चित्रपटावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ही बाब कंगनाला प्रचंड जिव्हारी लागलेली दिसत आहे.
बॉलिवूडवर भडकली कंगना!
आपल्या वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या रोखठोक बोलण्यामुळे कधी कोणावर वार करेल, काही सांगता येत नाही. तिने आता बॉलिवूडला निशाणा करत शीतयुद्ध छेडले आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार एकमेकांच्या चित्रपटांना प्रमोट करताना दिसतात. पण कंगनाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कोणताही कलाकार समोर न आल्यामुळे कंगनाने सर्वांना धारेवर धरले आहे. कोण काय माझ्या चित्रपटाला प्रमोट करणार, मला आधीच ३-४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एवढ्या कमी वयात मी फिल्ममेकर बनली आहे. मी स्वत:लाच प्रमोट करू शकते, असे कंगना माध्यमांशी बोलताना म्हणाली.
माझ्याविरोधात सर्वजण गँग करुन बसले आहेत. तर त्यांच्यासोबत मला कामही करायचे नाही. हे चित्रपट मी स्वत:साठी बनवले नाहीत. आपल्या येणाऱ्या पीढीसाठी हे चित्रपट आहेत. त्यांनी चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. आता मी मागे हटणार नाही. एकेकाला एक्स्पोझ करणार. सर्वांची वाट लावणार, असेही ती पुढे म्हणाली.
