फेक व्हिडिओ शेअर केल्यास ब्लॉक होणार अकाउंट

social-media
नवी दिल्ली – फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर फेक न्यूज, फेक व्हिडिओ आणि फेक फोटोवर निर्बंध घालण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सरकारने आदेश दिले आहेत, की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर होणाऱ्या फेक फोटो आणि व्हिडिओवर बंदी घालावी.

याबाबत सरकारचे म्हणणे आहे, की दररोज किंवा एक दिवसाआड प्लास्टिकचे तांदूळ, प्लास्टिकची कोबी आणि अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर होत आहेत. समाजात असे व्हिडिओ अफवा पसरवत आहेत आणि खाण्या-पिण्याच्या वस्तूंवरुन लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सोशल मीडिया कंपन्यांना सरकारने आवाहन केले आहे, की जे खाण्या-पिण्याचे फेक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात त्यांचे अकाउंट तातडीने ब्लॉक करण्यात यावे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी सोशल मीडियाला हे आदेश दिले आहेत.

पवन अग्रवाल म्हणाले, की सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ-फोटो शेअर करणे देशाची जनता आणि व्यापारी दोघांसाठीही हानिकारक आहे. यासंबंधी सोशल मीडिया कंपन्यांच्या हेड ऑफिसला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने निवेदन देखील पाठवले आहे. एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता ज्यामध्ये दावा करण्यात आला होता, की अंडे हे प्लास्टिकचे बनवण्यात येत असून दुधामध्ये केमिकल्स मिसळण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशा प्रकारच्या फेक व्हिडिओला आळा घालण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आता अशाप्रकारचे फेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याऱ्यांची खैर नाही.

Leave a Comment