ट्विटरवर ट्रेंड होत आहे #GoBackModi

trend
चेन्नई – दक्षिणेतील जनतेच्या रोषाला पंतप्रधान मोदींच्या तमिळनाडू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामोरे जावे लागले. एका बाजूला मदुराईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) चे अनावरण करण्यासाठी मोदी गेले असतानाच #GoBackModi म्हणजेच मोदी परत जा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंग होत आहे. केवळ ट्विटरवरच नव्हे तर मोदींच्या आगमनानंतर त्यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवूनही विरोध प्रदर्शन केले गेले.

तेथील जनतेमध्ये दक्षिणेकडील राज्यांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्यावरून केंद्र सरकारविरोधात असंतोष आहे. काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूमध्ये गाजा चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतरही या भागाला मोदींनी भेट दिली नसल्याने लोकांच्या मनात राग आहे. तुतीकोरीन येथील स्टेरलाईट प्रकल्पाविरोधात मागच्या वर्षी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणावर बाळगलेले मौनही लोकांना खटकले होते. कर्नाटक आणि तमिळनाडूत कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरु असलेल्या वादात केंद्र सरकारने कर्नाटकचीच बाजू घेतल्याची खदखदही तमिळनाडूच्या जनतेत आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने हा असंतोष ट्विटरच्या माध्यमातून बाहेर पडलेला दिसून आला.

मोदींनी मागच्या वर्षीदेखील चेन्नईतील डिफेन्स एक्स्पोला भेट दिल्यावर हाच हॅशटॅग ट्रेंडिंग झाला होता. त्यावेळी देखील मोंदीना शेकडो आंदोलकांनी काळे फुगे हवेत सोडून विरोध दर्शवला होता. या आंदोलकांना टाळण्यासाठी मोदींना आयआयटी मद्रासला जाताना चॉपरचा वापर करावा लागला होता. मदुराईत एम्स उभारण्याचे आश्वासन मोदींनी चार वर्षांपूर्वी दिले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एम्सचे उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.

Leave a Comment