ऑस्ट्रेलिया दौरा सोडून हार्दिक-राहुल मायदेशी परतणार

combo
मुंबई – बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर कॉफी विथ करण या शोमध्ये आक्षेपार्ह विधान केल्यामुळे कारवाई करताना त्यांना निलंबित केले आहे. या दोघांना आता निलंबनाच्या कारवाईमुळे ऑस्ट्रेलिया दौरा सोडून भारतात बीसीसीआयच्या चौकशीसाठी माघारी यावे लागले आहे. अष्टपैलू विजय शंकर आणि युवा खेळाडू शुभमन गिल यांची आता दोघांच्या जागी निवड करण्यात आली आहे.

सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याच्या जागी तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. तर, पंजाबजा धडाकेबाज फलंदाज युवा शुभमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. विजय शंकरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याची निवड करण्यात आली आहे. विजय शंकरने भारतीय संघाकडून ५ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. त्याने प्रथमश्रेणी कारकिर्दीत चांगली कामगिरी करताना ४१ सामन्यात १६३० धावांसह ३२ गडी बाद केले आहेत.


अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत पंजाबचा युवा खेळाडू शुभमन गिलने चांगली कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रथमश्रेणीतही त्याने चांगली कामगिरी करताना फक्त ९ सामन्यांत १ हजार धावा केल्या आहेत. रणजी सामन्यात त्याने तमिळनाडूविरुद्ध धडाकेबाज २६८ धावांची खेळी केली होती. भारतीय संघात शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण करेल.

Leave a Comment