विराटने वर्षातील शेवटच्या डावात शून्यावर बाद होऊनही २५ पेक्षा जास्त विक्रमांना गवसणी

virat-kohli
मेलबर्न – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुस-या डावात भोपळाही फोडता आला नाही. पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर मार्कस हॅरिसकडून झेलबाद झाला. तो वर्षाच्या शेवटच्या डावात शून्यावर बाद झाला. विराटने वर्षाची सुरुवात शतकाने केली असली तरी शेवट त्याने कडू केला. पण असे असले तरी यंदाच्या वर्षात विराटने २५ विश्वविक्रम केले आहेत.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून ३६ सामन्यात विराट कोहलीने २७३५ धावा केल्या आहेत. विराट यंदाच्या वर्षात २ हजारपेक्षा जास्त धावा काढणारा एकमेव खेळाडू ठरला. कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून विराटने ११ शतक झळकवली आहेत.

विराट कोहली जगात एकमेव असा खेळाडू आहे ज्याने दोनदा २७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २०१७ मध्ये त्याने २८१८ धावा केल्या होत्या. कुमार संगकाराच्या नावावर एका वर्षात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आहेत. त्याने सर्वाधिक २८६८ धावा काढल्या होत्या. रिकी पाँटिंगच्या नावावर २८३३ धावा आहेत. विराट २८१८ धावा काढून तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत विराटने यंदा सर्वाधिक धावा केल्या आहेत. १३ कसोटीत १३२२ धावांचा रतीब घातला. श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने १२ कसोटीत ९६२ धावा करुन तो दुसऱ्या स्थानी राहिला.

कसोटीत विराट कोहलीने ५ शतके ठोकली आहे. बांगलादेशच्या मोमिनुल हक ८ सामन्यात ४ शतके ठोकून दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने कसोटीत २४३३ चेंडू खेळले आहेत. त्यानंतर भारताकडून चेतेश्वर पुजाराने १३ कसोटीत २१७६ चेंडू खेळले आहेत. विराटने कसोटीत १४४ चौकार ठोकले आहेत. श्रीलंकेच्या कुसल मेंडिस ११७ चौकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. १४ सामन्यात त्याने १२०२ धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्माने १९ सामन्यात १०३० धावा काढत दुसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने ६ शतके ठोकली आहेत. रोहितने १९ सामन्यात ५ वेळा शतकी खेळी केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील विराटची सरासरी सर्वाधिक ठरली. १२ सामन्यात त्याची १३३.५५ एवढी सरासरी राहिली. बांगलादेशच्या तमीम इकबालने १२ सामन्यात ८५.५० च्या सरासरीने ६८८४ धावा काढल्या आहेत. विराटची बॅट यंदा विदेशातही खूपच तळपली. त्याने ११३८ धावा वसूल केल्या. त्याने राहुल द्रविडने २००२ साली ११३७ धावाच्या विक्रमाला पाठीमागे टाकले. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ १२१२ धावा काढून अव्वल आहे.

Leave a Comment