
कणकवली – खासदारकी भाजपकडून घ्यायची आणि त्यांच्याच नावाने शिमगा करणा-यांना भाजपमध्ये स्थान नाही. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आपण राज्य प्रभारींकडे केली असल्याची माहिती दिली.
भाजपवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करा
दोन महिने आपण जिल्ह्यात नव्हतो. अन्यथा राणेंच्या हकालपट्टीचा ठराव यापूर्वीच जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेतला असता; पण त्यांनी यापुढे भाजपच्या नेतेमंडळींवर किंवा सरकारवर टीका केली तर जिल्हा भाजपची बैठक बोलावली जाईल आणि त्यात राणेंच्या हकालपट्टीचा ठराव घेऊन, तो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांकडे पाठविणार असल्याचेही जठार यांनी म्हटले आहे. जठार यांनी येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
जठार या दरम्यान म्हणाले, नुकतीच जिल्ह्यात राणेंनी विश्वासयात्रा काढली. त्यांनी यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. जर त्यांना टीका करायचीच असेल तर त्यांनी आधी सन्मानाने राजीनामा द्यावा. आम्ही राज्यप्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे त्यांच्या हकालपट्टीबाबतची मागणी केली आहे.
