कडेकोट बंदोबस्तात आजपासून मराठवाड्याची तहान भागवणार जायकवाडी

jaykwadi
अहमदनगर – सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने दाखल केलेली याचिका फेटाळली असून न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ९ वाजता मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाणी सोडताना निर्माण होऊ नये, यासाठी धरणावर १०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. सोबतच नाशिकच्या दारणा आणि गंगापूर धरणातूनही जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.

मुळा धरणाच्या ११ दरवाजांमधुन पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर भंडारदरा धरणातून ३.८५ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आंदोलने, मोर्चे आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुळा धरणातून सुरवातीला ६ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ८ तासांनी ८ हजार क्यूसेक आणि पुन्हा ८ तासांनी १२ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. तिसर्‍या दिवशी हा विसर्ग कमी कमी होत जाईल.

कुणीही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच जर कुणाचे विद्यूत पंप नदीपात्रात असतील, तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जीवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Comment