चांदीच्या कणांनी कमी होणार सापाच्या विषाची तीव्रता, मुंबई विद्यापीठाचे महत्वपूर्ण संशोधन

snake
मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिक शास्त्र विभागाने महत्वपूर्ण संशोधन केले असून एखादा साप चावल्यास त्या सापाच्या विषाची तीव्रता या संशोधनाच्या माध्यमातून कमी करता येणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेला याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. या संशोधनासाठी विद्यापीठातील विभागाने चांदीच्या धातूचे नॅनो कण तयार करुन त्याचे गुणधर्म तपासले. ज्या प्राथमिक चाचण्या संशोधनासाठी लागतात (गोल्ड स्टँडर्ड) त्या तपासून बघितल्या आणि त्याचे परिणामही उत्कृष्ट आले. चांदीचे नॅनो कण या चाचण्या साध्य करण्यासाठी जीवभौतिक तंत्राचा उपयोग करुन तयार केले. सापाच्या विषाची तीव्रता जवळ ९५-९८ टक्के एवढी कमी झाल्याचे त्या नॅनो कणांच्या विविध चाचण्यांद्वारे दिसून आले, अशी माहिती विद्यापीठाच्या जीवभौतिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे यांनी दिली.

जपानमधील जीवभौतिक शास्त्र आणि टॅाक्सिकॅान या संशोधन नियंतकालिकांमध्ये विद्यापीठाचे हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे. प्रा. डोंगरे यांना या संशोधनासाठी विद्यार्थी वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम यांचेही सहकार्य मिळत आहे. सापाचे विष, त्याचे दुष्परिणाम आणि योग्य उपचार पद्धती यासंबंधी संशोधन झाले नाही. हे क्षेत्र फार दुर्लक्षित आहे. जगभरात विशेषत: उष्णकटिबंधीय प्रदेशात साप चावल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण ही सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. विशेषत: ग्रामीण भागामध्ये साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण हे सुमारे ५२ हजार प्रतिवर्ष आहे. साप चावल्यानंतर त्याचे विष शरिरात पटकन पसरते. त्याचे परिणाम कमी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रांमध्ये सध्या तरी काही ठोस उपाय उपलब्ध नाही. सापाचे विष हे मुख्यतः मेंदू, ह्रदय, स्नायु आणि रक्ताभिसरण संस्था यांच्यावर हल्ला करते, त्यामुळे मृत्यू ओढवतो.

Leave a Comment