अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट


पाटणा : बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

आसामच्या तिलोई गावात १३ जुलै २०११ रोजी झालेल्या अपघातात सैनी साह यांचा मृत्यू झाला होता. रिलायन्स जनरल इन्शुरन्सची विमा पॉलिसी साह यांच्याकडे होती. विमा मोबदला मिळवण्यासाठी साह यांच्या कुटुंबीयांनी बिहारमधील मधेपुरा न्यायालयात दावा दाखल केला. साह यांच्या कुटुंबीयांस न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजारांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. पण कंपनीने दीड वर्ष उलटूनही कोणताही मोबदला न दिल्यामुळे साह यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनदा नोटीस बजावली, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.

Leave a Comment