गुजरातमधील स्थापत्य शास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘रानी की वाव’


‘बाव’ किंवा ‘वाव’ म्हणजेच पायऱ्या उतरून आतमध्ये जाता येणाऱ्या विहिरी भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. या विहिरींचे निर्माण स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. दिल्लीमध्ये असणारी ‘उग्रसेन की बावली’ आणि गुजरातमध्ये असणारी ‘रानी की वाव’ ही पर्यटकांसाठी मोठ्या आकर्षणाची केंद्रे आहेत. आपल्या राणीसाठी अनेक सुंदर इमारती बांधवून घेणारे राजे भारताच्या इतिहासामध्ये अनेक होऊन गेले. पण ‘रानी की वाव’चे निर्माण मात्र एका राणीने आपल्या दिवंगत पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ करविले. अश्या ह्या प्राचीन, पण अप्रतिम वास्तूला २०१४ साली ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’चा दर्जा, युनेस्कोतर्फे देण्यात आला.

ही ‘रानी की वाव’ गुजरातमधील पाटणच्या जवळ आहे. ह्या बावीचे निर्माण अकराव्या शतकामध्ये सोलंकी घराण्याचे राजे मूलराजा ह्यांचे पुत्र भीमदेव ह्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांची पत्नी रानी उदयमती ह्यांनी करविले होते. त्यानंतर सरस्वती नदीला पूर आल्याने ही बाव पाण्याने भरली, आणि त्यानंतर अनेक वर्षे ही बाव पुराच्या पाण्याने वाहून आणलेल्या मातीखाली दबून राहिली.

येथे पहिल्यांदाच जाणाऱ्याला ही जागा पटकन लक्षात येणार नाही, कारण येथे कुठेही भव्य इमारती नाहीत, वस्तू संग्रहालयेही नाहीत. ही बाव जमिनीच्या पातळीच्या खाली बनविलेली आहे. जमिनीच्या पातळीखाली सात मजले असलेली ही बाव ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद, आणि २७ मीटर खोल आहे. या बावीमध्ये असलेल्या प्रत्येक मजल्यावर अनेक देवादिकांच्या सुंदर मूर्ती आहेत. मध्यवर्ती मजल्यावरील मूर्ती विष्णूच्या दशावतारांचे प्रतीक आहेत. तसेच सर्वात खालील मजल्यावरील शेषशायी विष्णूची भव्य मूर्ती आहे.

या बावीमध्ये असलेल्या अनेक खांबांवर अप्रतिम असे मारू-गुर्जर शैलीचे कोरीवकाम आहे. या बावीची वास्तू इतकी भव्य आहे, की यामध्ये उतरणारे पर्यटक अगदी लहान मुंग्यांच्या प्रमाणे भासतात. प्राचीन काळी या बावी पाण्याच्या पुरवठ्यासाठी बांधल्या जात असत. तसेच येथे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना एकमेकांशी संवाद साधण्याचीही संधी मिळत असे. अश्या प्रकारच्या बावी राजस्थान आणि गुजरातमध्ये जास्त दिसून येत असत. सुरुवातीला अगदी साध्याच पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या ह्या बावी कालांतराने मोठ्या कौशल्याने, स्थापत्यशास्त्राचा वापर करून, देखणे कोरीवकाम असलेल्या खांबांचा वापर करून बांधविल्या जाऊ लागल्या. ‘रानी की वाव’ याचेच उत्तम उदाहरण आहे.

‘रानी की वाव’ अहमदाबादपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. अहमदाबाद येथून खासगी वाहनाने येथे जाता येते. तसेच येथे जाण्यासाठी सरकारी आणि खासगी बससेवाही उपलब्ध आहे.

Leave a Comment