
मोबाइल धारकांना त्रासदायक ठरणाऱ्या कॉल आणि एसएमएसच्या कटकटीपासून सूटका करण्याची तयारी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) केली असून ट्रायने यासंबंधी गुरूवारी नवे नियम जारी केले. यामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय अशाप्रकारच्या कॉल आणि एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच केवळ नोंदणीकृत संस्थेकडूनच मार्केटिंगशी निगडीत कॉल आणि एसएमएस पाठवले जातील याची दक्षता घेण्याचे आदेश टेलीकॉम कंपन्यांना ट्रायने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
त्रासदायक ठरणाऱ्या कॉल आणि एसएमएसच्या कटकटीपासून होणार सूटका
ट्रायने नियम बदलणे गरजेचे असल्याचे म्हणत नवे नियम बनवण्याचा हेतू स्पॅम कॉल्समुळे होणाऱ्या त्रासापासून ग्राहकांची सूटका करणे हा आहे. मेसेज पाठवणारे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेजेसचे वर्गीकरण करणारे यांची नोंदणी करणे नव्या नियमांतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे , तसेच ग्राहकांची परवानगी हे मेसेज पाठवण्याआधी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेक कंपन्या सद्यस्थितीला सरार्स नियमांचे उल्लंघन करतात, पण ग्राहकांकडे नव्या नियमांमध्ये पूर्ण नियंत्रण असेल. ग्राहकांनी जर आधी अशाप्रकारच्या कॉल्स अथवा मेसेजला परवानगी दिली असेल तरी नंतर परवानगी रद्द करण्याचा अधिकारही ग्राहकांना असेल.
