
नवी दिल्ली – भारतात हिंदी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली आणि लिहिली जाते. पण मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषकांचा इंटरनेट वापरात सर्वाधिक दबदबा असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. याबाबतचे सर्वेक्षण रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीने केले होते. मराठी नेटकरी त्यामध्ये इंटरनेटवर सर्वाधिक अॅक्टीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमचे ‘मराठी नेटकरी’च इंटरनेटवर सरस
द डीजिटल भारतीय भाषा अहवालानुसार (द्वितीय आवृत्ती) अंड्रॉईड युजर्सकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. रेव्हरीज आणि इंडिक की-बोर्ड स्वलेख फ्लीप हे अॅप डाऊनलोड केलेल्या ८९००० युजर्संचा त्यामध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक युजर्सकडून प्रमाण भाषेत सरासरी किती शब्द टाईप केले जातात हे त्यामध्ये तपासण्यात आले. त्यानुसार मराठी आणि बंगाली नागरिकांकडून डीजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच प्रादेशिक भाषेचा या युजर्संकडून अधिक प्रमाणात वापर करण्यात येतो.
या युजर्संकडूनच इंटरनेटवरील माहितीचाही सर्वाधिक उपयोग केला जात आहे. याशिवाय प्रमुख भारतीय भाषांसोबतच, बोडो, डोगरी, मैथिली, सिंधी आणि संताली भाषेचाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दरम्यान, आपल्या मोबाईलमध्ये ९९ टक्के भारतीय युजर्सं इंटरनेट कनेक्शन वापरतात. तर जवळपास ५४ टक्के युजर्स ५ ते ११हजार रुपयांच्या किमतीचे सर्वसाधारण मोबाईल वापारतात. नुकतेच गुगलने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार जुन २०१८ मध्ये ५०० मिलियन्स भारतीय युजर्स ऑनलाईन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये ७३ टक्के युजर्स त्यांच्या स्थानिक भाषेतून ऑनलाईन डेटा सर्च करतात.
