सायकलिंग करण्यासाठी कशा प्रकारची सायकल निवडाल?


सायकल खरेदीसाठी जेव्हा सायकलीच्या दुकानामध्ये आपण जातो, तेव्हा तिथे निरनिराळ्या प्रकारच्या सायकल्स ठेवलेल्या आपल्याला दिसतात. ह्यातली नेमकी कुठली सायकल आपण निवडावी ह्याबद्दल मनामध्ये काही अंशी गोंधळही उडतो. त्यामुळे सायकल खरेदी करताना तिचा वापर आपण नेमका कशासाठी करणार आहे ह्याचा विचार करून सायकलची निवड करावी. त्या संदर्भात ह्या काही टिप्स खास, सायकल खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘वेल्क्रो क्रश इंडिया डॉट कॉम’ च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जर तुम्हाला शहरामध्ये केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या उद्देशाने सायकल खरेदी करायची असेल, तर ‘सिटी बायसिकल’ खरेदी करावी. ह्या सायकलची फ्रेम अगदी साधी असून, त्याचा हँडलबार थोडासा उंचावलेला असतो. त्यामुळे सायकल चालविताना पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते. ह्या सायकलचे सीट मोठे असून, लांबवर सायकल चालवीत जाण्याच्या दृष्टीने आरामदायक असते. तसेच सिटी बाइक्स मध्ये खास महिलांसाठीही वेगळ्या सायकल उपलब्ध असतात. फिटनेस, व्यायाम आणि लांब अंतरे सायकलिंग करण्यासाठी सायकल खरेदी करणार असाल, तर हायब्रीड बाईक घेण्याचा विचार करा. ही सायकल हायब्रीड अशा साठी म्हटली जाते, कारण ह्यामध्ये रोड बाईक आणि माउंटन बाईक ह्या दोन्हीची फीचर्स असतात. ह्या सायकलची चाके रुंद असून, ह्याला सस्पेन्शनही असते. त्यामुळे लांबवर सायकलिंग करताना हादरे बसण्याचे प्रमाण पुष्कळ कमी असते. आजकाल बाजारामध्ये अनेक तऱ्हेच्या हायब्रीड सायकल उपलब्ध आहेत.

रोड बाइक्स ह्या साधारणपणे गतिमान वेग आणि परफॉरमन्स साठी बनविल्या जातात. ह्या सायकल डांबरी रस्त्यांवर चालवायच्या असतात. कच्च्या रस्त्यावर चालाविण्यासाठी ह्या सायकल नाहीत. बहुतेकवेळी जलद वेगाने सायकलिंग करिता अश्या सायकलचा वापर होताना पाहायला मिळतो. माऊंटन बाइक्स ह्या नावाप्रमाणे कच्च्या रस्त्यांवर चालविण्यासाठी उपयुक्त आहेत. ह्या सायकलचा वापर शहरातील रस्त्यांवर चालविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ह्या सायकलची चाके रुंद असून, वाळूवर, खडकाळ रस्त्यावर, मातीच्या कच्च्या रस्त्यावर ही सायकल चालविता येऊ शकते, आणि त्यामुळे ह्या सायकलला गियर्सही अधिक असतात., जेणेकरून कुठल्याही surface वर ही सायकल चालविता येऊ शकेल.

‘फॅट बाईक’ ह्या सायकलला नावाप्रमाणे चांगली जाडजूड टायर्स असतात. या तऱ्हेच्या बाइक्स बर्फामध्ये, किंवा खडकाळ, कच्च्या रस्त्यांवर चालविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येतात. तसेच ह्या सायकलवरून भरपूर सामान नेणे ही शक्य असते. ‘टाईम ट्रायल’ ह्या प्रकारच्या बाइक्स, ‘आयर्न मॅन’ सारख्या मोठमोठ्या रेसेस मध्ये पाहावयास मिळतात. ह्या बाइक्सची फ्रेम एरोडायनॅमिक्स लक्षात घेऊन बनविलेली असते. तसेच ह्याचा हँडलबारही विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेला असतो, जेणेकरून ही सायकल चालविणाऱ्याचे पोश्चर ठीक राहील. सायकलचा वापर करून स्टंटस् परफॉर्म करण्याच्या उद्देशाने बनविली गेलेली ‘बीएमएक्स’ ह्या प्रकारची सायकल उपलब्ध आहे. ह्या सायकलची फ्रेम लहान असून, हिची चाकेही लहान असतात. ह्या सायकलचा हँडलबार अगदी सरळ असून, ह्या सायकलला गियर नसतात. ३६० अंशामध्ये गोल फिरेल असा ह्या सायकलचा अॅक्सीस असल्याने स्टंट करण्याच्या दृष्टीने ह्या बाइक्स योग्य असतात.

Leave a Comment