या भारतीय रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी तुम्हाला आहे पासपोर्टची गरज


आपल्या देशामध्ये कुठेही रेल्वेमार्गे जाण्यासाठी खरे तर केवळ तिकीट आणि ओळखपत्राची आवश्यकता आहे. पण आपल्या देशामध्ये एक रेल्वे स्थानक असे ही आहे, जिथे जाण्यासाठी तुम्हाला केवळ रेल्वेचे तिकिटच नाही, तर पासपोर्टची देखील आवश्यकता आहे. तसेच येथे जाण्यासाठी सरकारी परवाना असावा लागतो. ह्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे अटारी. येथे जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिजा असणे बंधनकारक आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ह्या स्टेशनवर दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे बाराही महिने अगदी कडक पहारा असतो. ह्या स्थानकावर बिना व्हिजाच्या प्रवास करताना जर एखादी व्यक्ती आढळली, तर त्या व्यक्तीवर १४ फॉरिन अॅक्टनुसार, विना परवाना प्रवास करीत असल्याबद्दल गुन्हा दाखल केला जातो. ह्या गुन्ह्यासाठी जामीन देखील मोठ्या मुश्कीलीनेच मिळतो.

सगळ्यात जास्त सुरक्षा व्यवस्था असणारी समझोता एक्स्प्रेस ही गाडी ह्याच स्टेशनवरून सुटते. हे असे एकमेव स्थानक आहे, जिथे ट्रेनला हिरवा कंदील दाखविण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत ट्रेनमधील प्रवाश्यांची देखील अनुमती घेतली जाते. ह्या रेल्वे स्थानकावरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याच्या तिकिटावर त्याचा पासपोर्ट क्रमांक लिहिला जातो, आणि मगच त्याचे तिकीट ‘कन्फर्म’ होते. ह्या रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर सामान उचलण्यासाठी हमाल असण्याला बंदी आहे. त्यामुळे सामान कितीही जास्त असले, तरी प्रवाश्यांना ते स्वतःच उचलावे लागते. सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ट्रॉलीज ह्या स्थानकावर प्रवाश्यांसाठी उपलब्ध आहेत.

ह्या स्थानकावरील विश्रामकक्ष वातानुकुलीत असून, तेथील एल ई डी टीव्हीवर देशभक्तीपर गीते दाखविली जात असतात. ह्या स्थानकावरील प्रत्येक हालचालीची खबर, राजधानी दिल्लीतील मुख्यालयाला कळविली जात असते. तसेच ह्या स्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून सैन्याचे जवान सतत ह्या ठिकाणी तैनात असतात. ह्या स्थानकावर येणारी किंवा इथून जाणारी ट्रेन जर कोणत्याही कारणामुळे उशीरा जाणार असेल, किंवा येण्यास उशीर होणार असेल, तर भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही ठिकाणी तशी लेखी नोंद करणे बंधनकारक आहे. ह्या ठिकाणी सेनेतील जवनाबरोबर पंजाब पोलीस दलातील कर्मचारी देखील चोवीस तास तैनात असतात.

ह्या रेल्वे स्थानकावर छायाचित्रे खेचण्यास सक्त मनाई आहे. हे ठिकाण नुसतेच पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना ह्या रेल्वे स्थानकावर प्रवेश नाही. त्यांना रेल्वे स्टेशन दुरून पाहता येते. जर ह्या रेल्वे स्थानकाला केवला भेट देण्याच्या उद्देशाने जरी जायचे झाले, तरी ह्यासाठी गृह मंत्रालयातील निरनिराळ्या विभागांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते.

Leave a Comment