
नागालँडचा उल्लेख झाला, की काही प्रश्न हमखास समोर उभे राहतात. येथे जाणे सुरक्षित आहे का, येथील लोक कसे आहेत, येथे पर्यटनस्थळे आहेत का, असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात. पण ज्यांना भटकंती खरोखरच आवडते, त्यांनी ह्या शंकांचा जास्त विचार न करता, एक नवीन अनुभव घेण्याच्या दृष्टीने नागालँडला जरूर भेट द्यावी. नागालँड राज्यामध्ये आदिवासींच्या सतरा निरनिराळ्या जमाती आहेत. ह्यामध्ये अंगामी, आओ आणि चाखेसंग ह्या जमाती सर्वात पुढारलेल्या, प्रगत म्हणता येतील. नागालँडची राजधानी असलेले कोहिमा शहर एके काळी अंगामी जमातीच्या अधिपत्याखाली होते. ह्या जमातीच्या लोकांच्या कष्टांमुळे आज कोहिमा हे एक मोठे शहर बनले असून, ह्या राज्याची राजधानी बनले आहे. आज हे शहर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले असून, येथील ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ ह्या संगीतसमारोहाला हजेरी लावण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून येत असतात.
चला नागालँडच्या सफरीवर
नागालँड हा डोंगरांचा प्रदेश असून, येथे अनेक ठिकाणी ट्रेकिंग साठी जाण्याचा अनुभव घेता येतो. ह्यामध्ये द्झुको व्हॅलीतील ट्रेक हा सर्वात सुंदर ट्रेक समजला जातो. दरी खोऱ्यातील हा ट्रेक तीन दिवसांचा आहे. ह्या ट्रेकमध्ये अनेक झरे, अरण्ये, आणि तऱ्हे-तऱ्हेची फुले पाहण्यास मिळतात. त्याचप्रमाणे जाप्फू पीकचा ट्रेक दोन दिवसांचा आहे. नागालँडवर निसर्गाचा वरदहस्त आहे. येथे अरण्ये भरपूर असल्याने बर्ड वॉचिंगची आवड असणाऱ्यांना येथे निरनिराळे दुर्मिळ पक्षी पाहण्याचा आंनद लुटता येतो.

कोहिमा पासून २० किलोमीटर अंतरावर खोनोमा नामक सातशे वर्षे जुने गाव आहे. येथे होणारे ‘टेरेस फार्मिंग’ ह्या गावाची खासियत आहे. नागालँड राज्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त असल्याने येथे लोकगीतांना खूप महत्व आहे. झुथो हे नागालँडचे खास पेय आहे. ह्यालाच राईस बियर असे ही म्हटले जाते. कोहिमा येथील अभयारण्य, वस्तू संग्रहालय, चर्च, आणि सैनिकांची दफनभूमी, ही आवर्जून भेट द्यावी अशी ठिकाणे आहेत. कोहिमाला गेल्यानंतर येथील स्थानीय पदार्थांचा आस्वाद जरूर घ्यावा. स्थानीय पदार्थांमध्ये पोर्क स्ट्यू, भात हे मुख्य पदार्थ आहेत. तसेच उकडलेल्या भाज्या आणि ताजी फळे ह्यांचाही नागालँडमधील खान-पानामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कोहीमातील अतिथीगृह राहण्याच्या दृष्टीने अतिशय सोयीचे आहे. हे अतिथी गृह बस स्थानकाच्या जवळ असून, ह्या बसस्थानकावरून नागालँडच्या कोणत्याही भागामध्ये जाण्यासाठी बसेस उपलब्ध असतात. नागालँडमध्ये भ्रमंतीसाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यांतील काळ उत्तम आहे. येथे पोहोचण्यासाठी गुवाहाटी किंवा दिमापुर पर्यंत विमानाने, किंवा रेल्वे प्रवास करून त्यापुढे गाडीने कोहिमापर्यंत जाता येते
