लाटू देवता मंदिरचे रहस्य आजही कायम


उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेले लाटू देवता मंदिर आजही रहस्यामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिरात भक्तांना प्रवेश नाहीच पण पुजारीही डोळे आणि तोंड बांधून येथील देवतेची म्हणजे लाटूची पूजा करतात. लाटू हि नागदेवता असून हा नाग त्याच्या अति तेजस्वी मण्याचे रक्षण करतो असे मानले जाते. चमोली मधील देवाल येथे वान नावाच्या गटात हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी गुहा आहे. भक्त ७५ फुट लांबून या मंदिराचे दर्शन घेतात आणि पूजा करतात. पार्वतीचे दुसरे नाव नंदादेवी आहे. तिचा लाटू हा भाऊ मानला जातो.


या मंदिराचे कपाट म्हणजे दरवाजा वर्षातून एकदाच वैशाख पौर्णिमेला उघडतो. स्थानिक लोक सांगतात या मंदिरात नागराज आहेत आणि त्यांच्या अद्भुत मण्याचे ते रक्षण करतात. या मंदिराची कथा अशी कि शिव पार्वती विवाह झाला तेव्हा पार्वतीला सासरी म्हणजे कैलासावर पोहोचण्यासाठी तिचे भाऊ गेले होते त्यात तिचा चुलतभाऊ होता. वाटेत त्याला तहान लागली म्हणून एका घरात ठेवलेल्या मटक्यातून तो पाणी प्यायला गेला पण ते पाणी नव्हते तर दारू होती. दारू प्यायल्याने तो उत्पाद माजवू लागला तेव्हा रागावलेल्या पार्वती म्हणजे नंदादेवीने त्याला शाप दिला आणि या गुहेत त्याला कैद केले. लाटू तेथे सर्प रुपात राहिला.

घनदाट झाडीत समुद्रसपाटीपासून ८५०० फुट उंचीवर असलेल्या या गुहेत हे नागराज आहेत. त्याच्या जवळच्या मण्याचे तेज इतके तेजस्वी आहे कि नुसत्या डोळ्याने ते पहिले तर दृष्टी जाते असा समज आहे. हे तेज डोळ्यांना सहन होत नाही म्हणून पुजारी डोळे बांधून पूजा करतात. वैशाख पौर्णिमेला गुहेचे दार उघडले कि विष्णूसहस्त्रनाम म्हटले जाते. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते आणि भाविकांची खूप गर्दी होते. जे भाविक खऱ्या भक्तीने येथे येतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असाही विश्वास आहे.

Leave a Comment