
बँकेत नोकरी मिळविणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) 15,762 जागा रिकाम्या झाल्या असून त्यातील 10,300 कर्मचाऱ्यांची भरती बँक येत्या वर्षात करणार आहे.
खुशखबर! एसबीआय करणार 10,300 कर्मचाऱ्यांची भरती
एसबीआयमध्ये सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे वर्ष 2017-18 मध्ये 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. या जागा भरून काढण्यासाठी एसबीआय मार्च 2019 अखेर 10,300 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. “डिजिटायझेशन आणि विलीनीकरण प्रक्रियेमुळे खर्चात कपात होऊन कामकाजातील कार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे एकूण निवृत्त होणाऱ्यांपैकी 75 टक्के जागाच आम्ही भरणार आहोत. यावर्षी आम्ही 2,000 प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) आणि 8,300 लिपिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहोत. यांपैकी 1,100 आरक्षित वर्गातून असतील,” असे एसबीआयचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर प्रशांत कुमार यांनी मनीकंट्रोल या संकेतस्थळाला सांगितले.
एसबीआयने 22 मे रोजी जानेवारी ते मार्च या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला असून बँकेने 7,718 कोटी रुपयांचा प्रचंड तोटा नोंदविला होता. बँकिंग क्षेत्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक नुकसान आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे बँकेतील कर्मचारी संख्या 2,64,041 वर पोहोचली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हीच संख्या 2,79,803 होती.
