मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी


मोबाईल हँडसेटचे उत्पादन करण्याच्या बाबतीत भारताने व्हिएतनामला मागे टाकले असून जगात दुसरे स्थान मिळविले आहे. चीननंतर आता भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आईसीए) माहिती प्रसारणमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ही माहिती सादर केली आहे.

आईसीएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी या दोन केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यात ही माहिती कळविली आहे. बाजारपेठ संशोधन कंपनी आईएचएस, चीनचा राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरो आणि व्हिएतनामच्या सामान्य सांख्यिकी कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीचा हवाला त्यात देण्यात आला आहे.

या पत्रात दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील मोबाईल फोनचे वार्षिक उत्पादन 2014मध्ये 30 लाख एवढे होते, तर ते 2017 मध्ये वाढून 1.1 कोटी एवढे झाले आहे. इतकेच नव्हे तर भारताने व्हिएतनामला मागे टाकले एवढेच नव्हे तर भारत मोबाईल फोनची आयातही 2017-18 मध्ये कमी होऊन अर्ध्यावर आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने (एफटीटीएफ) ने 2019 पर्यंत मोबाईल फोनचे उत्पादन 50 कोटींपर्यंत पोचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांचे अंदाजे मूल्य सुमारे 46 अब्ज डॉलर एवढे असेल.

Leave a Comment