एसबीआयने बंद केली ४१ लाख बँक खाती


नवी दिल्ली – एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान किमान मासिक ठेव न ठेवणारी ४१.१६ लाख खाती स्टेट बँक ऑफ इंडियाने बंद केली असल्याचे एका आरटीआय प्रश्नाद्वारे समोर आले आहे.

एसबीआयने किमान मासिक ठेव न ठेवल्यास ग्राहकांकडून दंड वसूल करण्याच्या नियमामुळे चालू आर्थिक वर्षातील १० महिन्यांमध्ये (एप्रिल ते जानेवारी) ४१.१६ लाख खाती बंद केली. याबाबत माहिती देताना मध्य प्रदेशातील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी सांगितले, की एसबीआयच्या अधिकाऱ्याने त्यांनी केलेल्या आरटीआय याचिकेला दिलेल्या उत्तरात ही माहिती प्राप्त झाली आहे. किमान ठेव न ठेवणाऱ्यांवर दंड आकारण्याच्या नियमामुळे एसबीआयद्वारे आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान ३१ जानेवारीपर्यंत ४१.१६ लाख खाती बंद करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून देशातील या सर्वात मोठ्या बँकेने किमान बाकी न ठेवणाऱ्यांसाठीची दंडाचे शुल्क ७५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गौड यांनी सांगितले, एसबीआयने जर दंडाचे शुल्क कमी करण्याचा निर्णय वेळेत घेतला असता तर ४१.१६ लाख खाती गमावण्याची वेळ बँकेवर आली नसती. यासोबतच मोठ्या संख्येने गरीब लोकांचा समावेश असणाऱ्या खातेधारकांना त्रास झाला नसता.

दरम्यान मेट्रो व शहरी भागात किमान ठेव न ठेवणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम एसबीआयने ५० रुपयांवरून १५ रूपये केली आहे. यासोबतच छोट्या शहरांमध्ये दंडाची रक्कम ४० रुपयांवरून १२ रूपये केली असून ग्रामीण भागासाठी १० रुपये केली आहे. यामध्ये जीएसटी वेगळा लागेल.