भूकंप आल्यास…


काही दिवसांपूर्वीच उत्तर भारतामध्ये भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. सुदैवाने यामध्ये फारसे नुकसान झाले नाही. जपानसारख्या देशांमध्ये भूकंप सातत्याने येत असतात. त्यामुळे उद्भविणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तेथील सर्व नागरिकांना, त्यांच्या कामाच्या ठिकाणी, लहान मुलांना त्यांच्या शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. आपल्या देशामध्ये भूकंप येण्याचे प्रमाण जास्त नसले, तरी जेव्हा भूकंप येईल, किंवा येणार आहे अशी सूचना जारी केली जाईल तेव्हा नागरिकांनी घाबरुन न जाता कश्या प्रकारची खबरदारी घ्यायला हवी, हे जाणून घेणे अगत्याचे आहे. अश्या प्रकारची खबरदारी घेतल्याने भूकंपामुळे होणारी जीवितहानी काही प्रमाणात कमी होऊ शकते.

भूकंप येत आहे असे जाणाविल्यास, जर तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असलात, तर त्वरित एखाद्या मजबूत टेबलच्या खाली किंवा बेडच्या खाली जा. आपल्या हातांनी आपला चेहरा, विशेषतः डोळे झाकून घ्या. भूकंपाचे झटके थांबेपर्यंत टेबलच्या खालीच बसा, झटके पूर्णपणे थांबल्यानंतर बाहेर या. जर तुम्ही घराच्या बाहेर असाल, तर त्वरित एखाद्या मोकळ्या जागेकडे जावे. उंच इमारतींच्या जवळ, विजेच्या खांबांजवळ उभे राहू नये. जर तुम्ही गाडी चालवीत असाल, किंवा दुचाकी चालवीत असाल, तर गाडी थांबवून त्वरित गाडीतून बाहेर या आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. गाडी एखाद्या पुलावर किंवा फ्लाय ओव्हरवर उभी करू नका.

जर तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असाल, तर कोणत्याही परिस्थितीत मेणबत्ती किंवा काडेपेटने काडी जाळण्याचा प्रयत्न करू नका, अनेक वेळा भूकंपामुळे गॅस पाईपलाईन लिक झालेली असण्याची शक्यता असते. अश्यावेळी जर काडेपेटीची काडी पेटविली गेली, तर आग लागण्याचा संभव असतो. भूकंप येत असताना लिफ्टचा वापर करू नये. आपण सुरक्षित आहात याची खात्री करून घेऊन आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे का हे पाहावे.