सौंदर्य प्रसाधनांवर खर्चात पुरुषांची महिलांना मात


खास पुरुषांची क्षेत्रे असा लौकिक असलेल्या अनेक क्षेत्रात महिला पुरुषांना मागे टाकताना दिसत असल्या तरी फक्त महिलांचे मानले जात असलेल्या एका क्षेत्रात पुरुषांनी महिलांवर आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. हे क्षेत्र आहे सौंदर्य प्रसाधनांचे. असोचेम ने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार पुरुष सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यात महिलांपेक्षा अधिक पैसा खर्च करताना दिसत आहेत. यात २५ ते ४५ वयोगटातील पुरुष आघाडीवर आहेत.

या अहवालानुसार गेल्या तीन वर्षात पुरुष सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ वर्षाला ४५ टक्के दराने वाढती आहे. सध्याच्या १६,८०० कोटींवरून येत्या पाच वर्षात ती ३५ हजार कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. वाढती कमाई, वाढते शहरीकरण, जीवन शैलीतील बदल ही कारणे यामागे दिली जात आहेत. दाढी साठी वापरण्यात येणारी उत्पादने, गोरेपणा साठीची क्रीम यांचा खप सर्वाधिक आहे. त्याखालोखाल डीओडोरंट चा नंबर आहे. विशेष म्हणजे निव्हिया, लक्मे अश्या अनेक नामवंत कंपन्या पुरुषांसाठी प्रचंड मोठी प्रसाधन रेंज घेऊन आलेल्या आहेत व त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Leave a Comment