तुमचे दात संवेदनशील आहेत का? मग करा हे उपाय


आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतानाच, आपल्या दातांचे किंवा संपूर्ण तोंडाचे आरोग्य सांभाळणे देखील अतिशय महत्वाचे आहे. मुळाशी कमकुवत झालेले दात, दांतामध्ये कीड, दातांचा पिवळेपणा आणि काही थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने दातांमध्ये कळ येणारे संवेदनशील दात, या दातांशी निगडीत समस्या वारंवार आढळू लागल्या आहेत. जर तुमचे दात अतिशय संवेदनशील झाले असतील तर ती संवेदनशीलता कमी करण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

सर्वात पहिल्यांदा करावयाचा उपाय म्हणजे आपली नित्याची टूथपेस्ट वापरणे बंद करून, संवेदनशील दातांसाठी खास तयार केलेली टूथपेस्ट वापरावयास हवी. बाजारामध्ये अश्या अनेक पेस्ट उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या पेस्ट पैकी एकाची निवड करावी.

आपल्या दात ब्रश करण्याच्या सवयीमध्ये देखील परिवर्तन करायला हवे. जर आपण कडक ब्रीसल्सच्या ब्रशचा वापर करीत असाल आणि दात घासताना जर जोरजोराने घासत असाल, तर अश्याने दातांवर असलेले संरक्षक आवरण, म्हणजेच इनॅमल हळू हळू नाहीसे होऊन दात संवेदनशील बनत जातात. त्यामुळे दातांसाठी सॉफ्ट किंवा मिडीयम टूथब्रशचा वापर करावा व दात घासताना हळुवार ब्रश गोलाकार फिरवीत दात घासावेत.

जर दात संवेदनशील असतील, तर अॅसिडिक अन्नपदार्थांचे सेवन टाळावे. विशेषतः थंड सोडा युक्त शीतपेये संवेदनशील दातांना हानीकारक ठरू शकतात. त्यांच्यातील अॅसिड्समुळे दातांवरील इनॅमल आणखीनच खराब होते. जर शीतपेयांचे सेवन केलेच, तर त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी दात ब्रश करावेत. दात शुभ्र करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, किंवा अल्कोहोल युक्त माउथवॉश वापरण्याचे टाळावे. या उपायांनी दातांची संवेदनशीलता काही अंशी कमी करता येते. पण या समस्येवर संपूर्ण उपचार करण्याकरिता आपल्या डेन्टीस्टचा सल्ला जरूर घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment