गुजरात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार वाढ!


नवी दिल्ली – सरकारने अबकारी करात कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत वाढत आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ६९.७० रुपये मोजावे लागत आहेत. त्याच वेळी डिझेलला प्रति लिटर ५८.३३ रुपये द्यावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढीसाठी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जबाबदार आहेत.

यासंदर्भात मनीभास्करच्या रिपोर्टनुसार गुजरात निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपये वाढू शकतात. असे झाल्यास, या वेळी सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तथापि, अबकारी शुल्क कमी करण्याच्या प्रश्नावर ते काहीच म्हणाले नाही.

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. बुधवारी प्रति बॅरल ६५.७० डॉलर झाला. कच्च्या तेलाच्या किमती या ३० महिन्यांच्या उच्चस्तरावर आहेत. भारतात कच्च्या तेलाच्या किमती ६७.७० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. असे मानले जात आहे की गुजरात निवडणुकीच्या समाप्तीनंतर या कंपन्या किंमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करू शकतात.

Leave a Comment