कारपार्कची सुविधा असलेली आलिशान बस


जर्मनीच्या लग्झरी मोटर होम बनविणार्‍या वॉकनर मोबिलने आता अशी बस तयार केली आहे ज्यात आलिशान कारही पार्क करता येणार आहेत. या पार्क केलेल्या कार बाहेरून कुणाला दिसणारही नाहीत. विकेंडसाठी शहरापासून दूर जाऊ इच्छीणार्‍या तसेच या काळात छोट्या मोठ्या प्रवासाचा आनंद घेऊ इच्छीणार्‍या प्रवाशांसाठी ही बस अतिशय उपयुक्त असून ही बस म्हणजे चाकावरील अत्याधुनिक घरच आहे.

या बसची किंमत १० कोटी रूपये म्हणजे १२ लाख पौंड आहे. ४० फूट लांबीच्या या बसमध्ये झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी प्रशस्त जागा आहेच पण त्यात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे किचन व बाथरूमही आहे. या बसमध्ये कारपार्कसाठी विशेष सोय आहे. त्यात इलेक्ट्रोहायड्राॅलिक लिफट दिली गेली आहे. यामुळे कार बसच्या खालीच पार्क करता येते. कंपनीचे प्रमुख स्टीफन वॉकनर या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, बहुतेक मोटर होममध्ये सुसज्ज किचन नसते. या मोटरहोममध्ये ही त्रुटी भरून काढली गेली आहे. त्यामुळे हे चालते घर बनले आहे.


या बसमध्ये फेरारी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, पोर्शे सारख्या आलिशान कार पार्क करता येतात. अनेक बड्या कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत. हे बडे ग्राहक सुटी घेताना कधी प्रवास सुरू करायचा, कुठे जायचे व कांही आणीबाणीची परिस्थिती आलीच तर त्वरीत परतण्याची सुविधा यांचे निर्णय स्वतः घेतात. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही बस बनविली गेली आहे. कार बसमध्येच पार्क करण्याची सुविधा असल्याने कुणालाही कांही कारणाने त्वरीत परतावे लागले तर त्याची सोय त्यामुळे होऊ शकणार आहे.

Leave a Comment