
दिल्ली क्राईम ब्रँचमधील ५० पेक्षा अधिक एनकाऊंटर स्पेशालिस्टच्या यादीत आघाडीवर असलेले व अखेर २४ मार्च २००८ साली गुडगांव येथे प्रॉपर्टी एजंटच्या गोळीला बळी पडलेले जाँबाज पोलिस अधिकारी एसीपी रणबीरसिंग यांचा मुलगा रोहित याने वडीलांचा आदर्श ठेवून एसीपी होण्याची कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे रणबीरसिंग यांची हत्या झाली तेव्हा रोहित अवघा १६ वर्षांचा होता मात्र कुटुंबावर कोसळलेल्या या आघाताने अजिबात विचलीत न होता अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नंतर त्यांनी आयपीएस ची परिक्षा यशस्वी पणे पार केली. त्यांना अपेक्षेप्रमाणे दिल्ली केडर मिळाले असून आता ते पटेलनगर येथे एसीपी म्हणून कार्यरत आहेत.
जाँबाज पोलिस अधिकार्याचा मुलगा बनला एसीपी
वडिलांच्या शौर्यकथा ऐकतच रोहित लहानाचा मोठा झाला मात्र वडीलांची हत्या झाल्यानंतर खचून न जाता आपणही पोलिस सेवेतच भरती व्हायचे असा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी कठीण संघर्ष त्यांना करावा लागला मात्र अखेर आपले ध्येय साध्य करण्यात ते यशस्वी ठरले. २०१५ साली त्यांनी यूपीएससीची परिक्षा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर हैद्राबाद येथे त्यांचे प्रशिक्षण पार पडले.
पटेलनगर येथे एसीपी म्हणून जबाबदारी पेलताना त्यांनी अनेक खून, लुटालूट यासारख्या गंभीर गुन्हांची यशस्वी उकल केली आहे. महिलासंदर्भातील गुन्हांवर नियंत्रण आणणे ही त्यांची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
