कोणत्या महिन्यामध्ये लावाव्या कोणत्या भाज्या


बाजारातून भाज्या आपण आणतो खऱ्या, पण घरी पिकविलेल्या भाज्यांची चव त्या भाज्यांना येतच नाही. निरनिराळ्या रसायनांची इंजेक्शने देऊन भाज्या वेळेआधी पिकविल्या गेल्या असल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. शिवाय भाज्यांच्या सततच्या चढणाऱ्या आणि क्वचितच उतरणाऱ्या किमतींनी देखील ग्राहकांच्या नाकी नऊ आणलेले असतात. अशा वेळी भाज्या घरच्याघरी पिकविण्याच्या पर्यायाचा विचार जरूर करावा. जर आपल्या घराभोवती थोडी मोकळी जागा असेल किंवा घराला गच्ची असेल, तर तिथे भाज्या पिकविणे शक्य आहे. केवळ घरांच्या बागेमध्येच भाज्या पिकविता येतात असे नाही, तर आजकाल हौशी लोक कुंड्यांमध्ये ही घरच्या घरी भाज्या पिकवू लागले आहेत. या करिता कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या भाज्या लावायच्या हे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीने भाज्यांच्या रोपांची योग्य निगा घेतली की भाज्या मुबलक प्रमाणात तयार होतात.

भाज्या लावत असताना आपण राहतो त्या ठिकाणचे हवामान, जमिनीचा कस, पाण्याची सुविधा इत्यादी गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तसेच भाज्या तयार होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो, किंवा त्यांची निगा घेण्यासाठी कोणत्या प्रकारची खते आवश्यक आहेत, भाज्यांवर कीड पडू नये म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, ही सर्व प्रकारची माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्या बाबतीत अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडतो.

जानेवारी महिन्यामध्ये वांगी, पालक, मुळे, गाजरे, टोमॅटो, फरसबी, भेंडी, या भाज्या लावाव्यात. फेब्रुवारी महिन्यामध्ये कारली, दुधी भोपळा, काकडी, फरसबी, भेंडी, घोसाळी, कलिंगड, पालक, मुळे, कांदे, टोमॅटो, या भाज्या लावाव्यात. मार्च महिन्यामध्ये कारली, दुधी भोपळा, फरसबी, भेंडी, घोसाळी, पालक, लाल माठ, कोथिंबीर, इत्यादी भाज्या लावाव्यात. एप्रिल महिन्यामध्ये सिमला मिरची, कांदे, मिरच्या, घोसाळी, दोडके, टोमॅटो, कोथिंबीर, लाल माठ या भाज्या लावाव्यात.

मे महिन्यामध्ये भेंडी, कांदे आणि मिरच्या लावाव्यात. जून महिन्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात होते. त्याकाळी कोणत्याही भाज्या लावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जुलै महिन्यातही हवामान भाज्यांच्या वाढीसाठी पूरक असल्याने, या महिन्यातही सर्व प्रकारच्या भाज्या लावता येऊ शकतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गाजरे, फ्लॉवर, बीन्स आणि बीट या भाज्या लावाव्यात. सप्टेंबर महिन्यामध्ये फ्लॉवर, काकडी, कांदे, मटार, पालक या भाज्या लावाव्यात.

ऑक्टोबर महिन्यामध्ये वांगी, कोबी, सिमला मिरची, काकडी, मटार, पालक, शलगम यांसाख्या भाज्या लावता येतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये बीट, वांगी, कोबी, गाजरे, भेंडी, इत्यादी भाज्या लावाव्यात. डिसेंबर महिन्यामध्ये भोपळा, दुधी भोपळा, काकडी, मिरच्या, कोबी, कारली, दोडके इत्यादी भाज्या लावता येतील.

Leave a Comment