या सेलिब्रिटींनीही तत्त्वासाठी नाकारल्या कोट्यावधींच्या जाहिराती


जाहिरात ही ६५ वी कला म्हणून जगात मान्यता पावली आहे. जवळजवळ प्रत्येक उत्पादन कंपनी आपल्या कंपनीची उत्पादने जास्त विकली जावीत यासाठी जाहिरातींचा आधार घेतात. त्यातही लोकप्रतिष्ठा असलेल्या, प्रसिद्ध व्यक्ती जाहिरातींसाठी आवर्जुन निवडल्या जातात. कंपनीच्या उत्पादनांसाठी ब्रँड अँबेसिडर नेमले जातात व त्यांच्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च केला जात असतो. जाहिराती कशा बनवाव्या हे शिकविणारे कोर्सस प्रचंड शुल्क आकारून चालविले जातात व आपल्या उत्पादनासाठी कोणाची निवड केली तर उत्पादन जास्त खपेल याचा अंदाज तज्ञांशी सल्ला मसलत करून घेतला जातो त्यासाठी तज्ञांनाही प्रचंड फी दयावी लागते.


जाहिराती संदर्भात हे सारे निघाले ते आपल्या टीम इंडियाच्या कप्तानाने म्हणजे विराट कोहलीने शीतपेयांची जाहिरात करण्यास दिलेल्या नकारावरून. विराटने कोट्यावधी रूपयांची कमाई करून देणारी ही जाहिरात तो स्वतः शीतपेये पित नाही त्यामुळे लोकांना ते प्यावे असे अपील करू शकत नाही असे सांगून ही जाहिरात नाकारली. विराट फिटनेसवेडा आहे व शीतपेयांमुळे फिटनेसला नुकसान पोहोचू शकते असे त्याचे म्हणणे आहे.


अर्थात अशा प्रचंड पैसा देणार्‍या जाहिराती नाकारणारा विराट हा एकमेव सेलिब्रिटी नाही. बॅटमिंटनपटू व सिंधू, सायनाचे कोच पुल्लेला गोपीचंद यांनीही याच कारणास्तव कोला कंपनीची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला होता.


आमीरखान हा परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूड नगरीला परिचित आहे. त्यानेही लग्झरी वा चैनीच्या खातर वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या जाहिराती करण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता मात्र समाज सुधारणा अथवा सामाजिक कार्यांविषयीच्या मोहिमांच्या जाहिराती करण्यास तो आजही पंसती देतो. मग त्यातून उत्पन्न मिळो वा ना मिळो.


अमिताभ बच्चन- बिग बी नाहीत अशी जाहिरात शोधणे हे समुद्रातून सुई शोधण्यासारखे काम आहे. वयाच्या ७५ जवळ पोहोचलेले बिग बी आज अनेक उत्पादनांच्या जाहिराती करतात मात्र त्यांनीही तत्त्वांशी तडजोड केलेली नाही. आज अनेक प्रसिद्ध ब्रँडचे सदिच्छा दूत अ्रसलेल्या बिग बी नी नकळत हुंड्याला प्रोत्साहन देणार्‍या एका प्रसिद्ध कंपनीची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला होता.


जॉन अब्राहम- बॉलीवूडमधला हा तगडा देखणा हिरो आज सिनेसृष्टीतील सर्वात फिट कलाकार मानला जातो. नित्यनेमाने तो जिम मध्ये भरपूर घाम गाळत असतो. आरोग्याला नुकसान करणार्‍या कोणत्याही पदार्थाची जाहिरात तो करत नाही. अनेक टोबॅको व अल्कोहोल कंपन्यांकडून कोट्यावधींची ऑफर येऊनही त्याने या जाहिराती केलेल्या नाहीत.

Leave a Comment