अभिनेत्रींचे ग्लॅमर क्षणिक: शर्वरी जमेनीस


शास्त्रीय नृत्याद्वारे भारतीय परंपरेच्या प्रसाराचे कार्य अधिक समाधानाचे
पुणे: अभिनेत्री होण्याची वेळ माझ्या आयुष्यात अपघातानेच आली. चित्रपट क्षेत्रातील चमक धमक; पैसा आणि प्रसिद्धी मी अनुभवली. मात्र विशेषत: अभिनेत्रींसाठी त्यांचे पैसा आणि प्रसिद्धीचे वलय क्षणिक असल्याचे या काळात जाणवले. आपल्यातल्या कलाकाराला आव्हान देण्यासाठी मी काही चित्रपटात काम करत असले तरीही शास्त्रीय नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे; ध्यास आहे आणि श्वास आहे; अशा शब्दात विख्यात शास्त्रीय नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी आपल्या भावना ‘म पेपर’शी बोलताना व्यक्त केल्या.

शास्त्रीय कला ही भारताने मानवी संस्कृतीला; जगाला दिलेली देणगी आहे. शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून मी भारतीय परंपरेचा जगभर प्रसार करीत आहे; याचा मला सार्थ अभिमान आहे; असे शर्वरीने नमूद केले. ऑस्ट्रेलियामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमात झाशीची राणी आपल्या मुलाचे कदाचित शेवटचे चुंबन घेऊन त्याला सखीच्या स्वाधीन करते आणि रणात उडी घेते; त्या आईला आपला मुलगा परत भेटेल की नाही; ही चिंता असते; हे दृश्य नृत्यातून सादर केले. त्यावेळी कार्यक्रम संपल्यावर त्या देशातील दोन माता भेटीला आल्या. त्यांनी या दृश्याने आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे सांगितले. तेव्हा मानवी भावना सार्वत्रिक असल्याची जाणीव झाल्याचे शर्वरी सांगते.

सध्याच्या काळात रिॲलिटी शो च्या माध्यमातून अनेक कलाकारांना संधी मिळत असल्याचे बोलले जाते. मात्र शर्वरीने याबाबत अतिशय परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणते की या शोज मध्ये ५ वर्षाच्या मुली आयटम सॉंग किंवा लावणीमध्ये ठुमके लगावतात. त्या दिसतातही छान! मात्र ‘यौवन बीजली’ या याचा अर्थ तिला कळतो का? किंवा कळावा का? तिथेच तिचे बालपण संपत नाही का? असे अनेक प्रश्न तिने उपस्थित केले. लहान मुला मुलींमध्ये नृत्यासारख्या अभिजात कलांचा विकास करायचा असेल तर त्यांना त्यांच्या कलेला चौकटीत बंदिस्त न करता खुला वाव द्यायला हवा; असे शर्वरी म्हणाली.

मी नृत्यात अभ्यास करीत सरताना माझी मैत्रीण नाट्यशास्त्रात अभ्यास करीत होती. त्यावेळी बसवत असलेल्या नाटकात शास्त्रीय नर्तिकेची आवश्यकता असताना तिने मला ही उत्तरेची भूमिका दिली. त्या स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यामुळे मला ‘बिनधास्त’ हा चित्रपट मिळाला. मात्र या चित्रपटासाठी माझ्या गुरू रोहिणी भाटे यांची परवानगी घेताना त्यांच्या डोळ्यात मी एक भीती बघितली. जिच्यावर नर्तिका म्हणून १० वर्ष कष्ट घेतले; ती या ग्लॅमरस क्षेत्रात हरवून जाण्याची ती भीती होती. मात्र मी त्यांना ग्वाही दिली की; या क्षेत्रात वाहून जाणार नाही. ‘बिनधास्त’नंतर मला अनेक मालिका आणि चित्रपटांचा प्रस्ताव आला. मात्र मला या चौकटीत अडकण्यापेक्षा नृत्यकलेमध्ये अधिक रस असल्याने मी त्या ऑफर नाकारल्या आणि या निर्णयाचा मला अजिबात पश्चात्ताप नाही; असे तिने सांगितले.

Leave a Comment