तुमच्या परिवाराकरिता योग्य मोबाईल प्लॅन कसा निवडाल?


आजकाल घरोघरी मोबाईल फोन ही प्रत्येकाची लाइफलाईन झाली आहे. घरातील मोठ्या माणसांपासून ते अगदी चिल्ल्यापिल्ल्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातामध्ये मोबाईल दिसत असतो. त्यातूनही घरातील वडीलधारी मंडळी केवळ इतरांशी संपर्क साधण्यापुरताच मोबाईल फोन चा वापर करताना दिसतात. पण तरुणाई मात्र सतत मित्रामैत्रिणींशी गप्पा आणि त्यासोबतच व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम, फेसबुक, एक ना अनेक अॅप्स आणि गेम्स मध्ये गुंग झालेली दिसते. या सर्व अॅप्स साठी डेटा कनेक्शनची गरज लागत असल्याने, मोबाईल फोन चे बिल अर्थातच जास्त येण्याची शक्यता असते. अश्या वेळी घरातील सर्वच व्यक्तींमध्ये मिळून एकच फॅमिली प्लॅन घेतल्यास त्याद्वारे पुष्कळ बचत केली जाऊ शकते.

आपल्या परिवारासाठी योग्य फॅमिली प्लॅन कसा निवडायचा हे जाणून घेणे आवश्यक आहे. एका मोबाईल फॅमिली प्लॅनच्या द्वारे अनेक फायदे मिळू शकतात. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या फोन चे स्वतंत्र प्लॅन्स आणि त्यांची स्वतंत्रपणे भरावी लागणारी बिले यामधे होणारा खर्च, पूर्ण परिवारासाठी एकच फॅमिली प्लॅन घेऊन नक्कीच कमी करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या परिवाराकरिता मोबाईल फॅमिली प्लॅन निवडायचा झाल्यास सर्वप्रथम आपल्या परिवारातील सदस्यांच्या मोबाईल च्या वापराची गरज लक्षात घ्यावी. घरामध्ये किती सदस्य मोबाईल वापरणारे आहेत, त्यांना फोन कॉल्स आणि डेटाची कितपत गरज आहे, आणि या सर्व सदस्यांचा एकत्र खर्च करायचा झाल्यास आपल्याला किती खर्च करणे परवडणार आहे याचा विचार करून फॅमिली प्लॅन निवडावा. उदाहरणार्थ, एका परिवारामध्ये पाच सदस्य असल्यास, कोण्या एका सदस्याच्या नावे ‘ पेरेंट अकाउंट ‘ असून, बाकी सदस्यांना ‘ युजर ‘ म्हणून या प्लॅनमध्ये सहभागी होता येते. तसेच प्रत्येक युजरची डेटा वापराची सीमा आधी पासूनच ठरविता येत असल्याने खर्चासही आळा घालता येतो. दोघे पालक आणि त्यांची मुले असा परिवार असणाऱ्यांसाठी असा प्लॅन उत्तम ठरतो.

प्लॅन निवडताना, त्या प्लॅन मधील सर्व युजर्स साठी आपापसातील फोन कॉल निःशुल्क मिळतील असा प्लॅन निवडावा. त्यामुळे या प्लॅन मध्ये सहभागी असलेले युजर्स एकमेकांशी कितीही वेळ बोलले तरी त्या फोन कॉल्स वर कोणत्याही प्रकारचे दर आकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर आपल्या परिवारातील सदस्यांच्या डेटा वापराच्या गरजांनुसार आपला मोबाईल प्लॅन ‘कस्टमाइज’ करून घ्यावा, म्हणजेच प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन आपला प्लॅन तयार करून घ्यावा. त्याचबरोबर आपल्या घरात किती सदस्य आहेत हे ही लक्षात घ्यावे. एखाद्या घरामध्ये दोनच व्यक्ती मोबाईल कॉलिंग आणि डेटा वापरत असतील, तर एखाद्या घरामध्ये ह्या सुविधा वापरणारे सहा सदस्य असतील. या दोन्हीही परिवारांच्या मोबाईलच्या बिलांमध्ये अर्थातच तफावत असेल. त्यामुळे ‘ सर्वांसाठी एकसमान ‘ हे धोरण इथे पाळून उपयोग नाही. आपल्या परिवारामध्ये किती लोक मोबाईल वापरणार आहेत हे लक्षात घेऊनच योग्य प्लॅनची निवड करावी.

Leave a Comment