विचित्र ठिकाणी लोकांना अचानक झाला धनलाभ


‘दिवस काबाडकष्ट करण्यात गेला आणि संध्याकाळ होता होता अचानक मोठे घबाड हाती लागून आयुष्याचे कल्याण झाले ‘ असे दृश्य एखाद्या हॉलीवूड किंवा बॉलीवूड पटातच शोभून दिसेल. पण या जगामध्ये अश्या काही व्यक्ती आहेत, ज्यांच्या बाबतीत ही अविश्वसनीय वाटणारी घटना घडली आहे. ध्यानीमनीही नसताना या लोकांना, आपण कल्पनाही करू शकणार नाही अश्या जागी धन सापडले आणि या व्यक्तींची आयुष्येच बदलून गेली. या व्यक्तींना धन नक्की कुठे कुठे सापडले ह्याचे किस्से ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

निक मीड या ब्रिटीश व्यक्तीने ई – बे य ऑनलाईन सामान खरेदी करता येणाऱ्या वेबसाईटवरुन चक्क एक रणगाडा विकत घेतला. हा रणगाडा रशियन बनावटीचा होता. निकने हा जुना रणगाडा, त्याचे नूतनीकरण करण्याच्या इराद्याने विकत घेतला. या कामी त्याने त्याचा मित्र टॉड चेम्बरलेन याची मदत घेतली. मीड ने या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामाचे चित्रीकरण करण्याचे ठरविले. जर या रणगाड्यामध्ये काही हत्यारे किंवा विस्फोटके सापडली तर ती बॉम्ब डिस्पोजल युनिटला दाखवता यावीत या उद्देशाने हे चित्रीकरण करण्याचे ठरविले गेले. पण आश्चर्य असे, की या रणगाड्यामध्ये निक याला प्रत्येकी १२ पौंड वजनाच्या शुद्ध सोन्याच्या विटा सापडल्या. त्यानंतर निकने सरकारी अधिकाऱ्यांना या बद्दल सूचना दिल्यावर त्यांनी निक कडील या सोन्याच्या विटा तपासणीसाठी ताब्यात घेतल्या. १९९० सालच्या गल्फ युद्धामध्ये इराकी सैनिकांनी हे सोने कुवेत येथून लुटले असावे असा प्राथामिक अंदाज आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका दाम्पत्याला २०१३ साली अचानक धनलाभ झाला. हे दाम्पत्य आपल्या पाळीव कुत्र्यासोबात आपल्या घराच्या परिसरात फिरायला गेले असताना काहीतरी चमकदार वस्तू गवतामध्ये दिसल्याचा त्यांना भास झाला. जवळ जाऊन जेव्हा त्यांनी याचा अधिक तपास केला तेव्हा त्यांना गंज चढलेला एक डबा सापडला. त्या डब्यात काय असावे असे आश्चर्य मनाशी करीत त्यांनी डबा उघडून पाहिल्यावर त्यांना त्या डब्यामध्ये चक्क सोन्याची नाणी सापडली. १८४७ ते १८९४ दरम्यानची एकूण १४०० सोन्याची नाणी त्या डब्यामध्ये होती. त्या दाम्पत्याने स्वतःच्या सुरक्षेच्या खातर स्वतःचे नाव कधीही उघड केले नसले, तरी त्यांना सापडलेली काही सोन्याची नाणी त्यांनी अॅमेझोन आणि ई बे या वेबसाईटवर विकली असल्याचे समजते.

एका जर्मन विद्यार्थिनीला, तिने विकत घेतलेल्या सोफ्यामधून १०/१५ या आकाराचे एक तैलचित्र सापडले. या तैलचित्राची किंमत त्या सोफ्यापेक्षा १०० पतीने जास्त होती. या विद्यार्थिनीने आपले नाव कधीही जाहीर केले नाही. पण हॅमबर्ग येथील लिलावामध्ये या तैलचित्राला तब्बल २७,६३० डॉलर्स इतकी किंमत मिळाली. हे तैलचित्र १७ व्या शतकामध्ये बनविले गेले असल्याचे जाणकारांचा अंदाज आहे.

जेफ बिडलमन या पेन्सिल्वेनिया येथील संग्रहकाचा, दुर्मिळ वस्तूंचा खासगी संग्रह आहे. दुर्मिळ वस्तूंच्या शोधामध्ये जेफ सतत भ्रमंती करीत असतो. २००७ साली, साधारण वीस वर्षे रिकाम्या पडून असलेल्या घरामध्ये जेफ दुर्मिळ वस्तूंचा शोध घेत होता. त्या घराच्या मालकाचे निधन झाले होते आणि त्याच्या मुलांनी जेफला त्या घरामध्ये काही विकता येण्याजोगे सामान सापडते का, याचा शोध घेण्यास सांगितले होते. जेफ या घरामध्ये शोध घेत असताना त्याला प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढिगारा सापडला. त्या ढिगाऱ्या मागच्या भिंतीमध्ये त्याला एक मोठे भोक दिसले. त्याबद्दल जेफने त्या घरमालकाच्या मुलीकडे विचारणा केली असता, तिने त्याला एक रोचक गोष्ट सांगितली. परिवारातील लोक पूर्वी त्या भिंतीतल्या भोकामध्ये पैसे टाकत असल्याची कथा लहानपणापासून ऐकत आल्याचे तिने जेफ ला सांगितले. जेफने ही भिंत उकरून पाहण्याचे ठरविले. आश्चर्य असे की त्याला त्या भिंतीत चक्क दुर्मिळ नाण्यांचा संग्रह सापडला. या नाण्यांची किंमत २००,००० डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले जाते.

थॉमस शुल्त्झ आणि लॅरी जोसेफ या बांधकाम व्यावसायिकांनी एक जुने, पडायला आलेले घर विकत घेऊन, ते नव्याने बांधून जास्त किमतीला विकायचे ठरविले. त्यांनी ते घर ३००,००० डॉलर्स इतकी किंमत देऊन खरेदी केले. ह्या घराचे परीक्षण करीत असताना त्यांना आर्थर पिनाजियान या व्यक्तीने बनविलेली काही चित्रे सापडली. आर्थर पिनाजीयान पूर्वी या घरामध्ये रहात असताना त्याने ही चित्रे बनविली होती. ही चित्रे इतक्या उत्तम प्रतीची होती की थॉमस आणि लॅरी यांनी ती चित्रे विकायचे ठरविले. त्या चित्रांची त्यांना तब्बल तीस मिलियन डॉलर्स इतकी किंमत मिळाली.

Leave a Comment