अण्णाद्रमुकचे एकीकरण


तामिळनाडूमध्ये गेल्या ५० वर्षांपासून राजकारण व्यक्तीकेंद्रित झाले आहे. कामराज, अण्णादुराई, करूणानिधी, रामचंद्रन, जयललिता अशा एकेका करिश्माई नेत्यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. आता सध्या एम. करुणानिधी हे हयात आहेत. परंतु ते अतीशय वृध्द झाल्यामुळे त्यांचा त्यांच्या पक्षावर प्रभाव राहिलेला नाही. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या मुलांपैकी कोणीही पक्षावर असे वर्चस्व निर्माण करू शकणार नाहीत. दुसर्‍या बाजूला जयललिता यांचे निधन झालेले आहे आणि त्यांच्याही पक्षात आता तेवढा प्रभावी नेता कोणी राहिलेला नाही. त्यांची जागा त्यांची मैत्रीण शशिकला या घेतील आणि व्यक्तीकेंद्रित राजकारण पुढे जारी राहील असे वाटले होते. परंतु घटनाच अशा नाट्यमय घडल्या या की सगळ्याच शक्यतांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.

शशिकला या तुरुंगात गेल्यामुळे हे घडले. असे घडले असले तरी शशिकला यांची कल्पना वेगळीच होती. आपण चार वर्षे तुरुंगात राहिलो तरी तिथे राहून आपण अण्णा द्रमुकच्या राजकारणावर आपले वर्चस्व ठेवू अशी त्यांची कल्पना होती. परंतु पक्षातल्या काही नेत्यांनी असा विचार करण्याची काही गरज नाही हे लक्षात घेतले आणि आज शशिकला यांचे वर्चस्व झुगारून देत अण्णाद्रमुकचे दोन्ही गट एक होत आहेत. शशिकला या तुरुंगात जाण्याच्या आधी ओ. पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री झाले होते. परंतु त्यांच्या विरोधात शशिकला यांनीच बंड पुकारले आणि पनीरसेल्वम यांना हटवून त्या जागी आपल्या प्रभावीखाली असलेल्या पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री केले. मात्र या दोन्ही गटांना आता सत्वाची जाणीव झाली आहे आणि त्यांनी शशिकलांचे जोखड झुगारून देण्याचे ठरवले आहे.

आता पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम या दोघांनी आज एकत्र येण्याची घोषणा केली. शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि आपला अण्णाद्रमुक हाच खरा अद्रमुक पक्ष असल्याचा दावा केला. या निमित्ताने झालेल्या तडजोडीमध्ये पलानीस्वामी हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये होत असलेला हा एक फार मोठा बदल आहे. त्यामुळे व्यक्तीकेंद्रित राजकारण संपणार आहे. शशिकला या तुरुंगात असल्या तरीही आपला पुतण्या दिनकरण यांच्या माध्यमातून त्या पक्षावर वर्चस्व ठेवणार होत्या. मात्र आता दिनकरण यांचीच हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment